कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडला शेतमाल, दोन आडत्यांसह ७ चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:24+5:302021-06-16T04:43:24+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब व वाशी तालुक्यात धुडगूस घालणारी ढोकीजवळील राजेशनगर पेढीवरील एक टोळीच गुन्हे शाखेने काेम्बिंग ऑपरेशन राबवून ...

In the combing operation, 7 stolen goods including farm goods were found | कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडला शेतमाल, दोन आडत्यांसह ७ चोरटे गजाआड

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडला शेतमाल, दोन आडत्यांसह ७ चोरटे गजाआड

googlenewsNext

उस्मानाबाद : उस्मानाबादसह कळंब व वाशी तालुक्यात धुडगूस घालणारी ढोकीजवळील राजेशनगर पेढीवरील एक टोळीच गुन्हे शाखेने काेम्बिंग ऑपरेशन राबवून सोमवारी पहाटे गजाआड केली आहे. या कारवाईत साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर ७ चोरट्यांसह चोरीचा शेतमाल विकत घेणाऱ्या दोन आडत्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

तीन तालुक्यांमध्ये शेतमालाची चोरी करणाऱ्या एका टोळीने मोठा उच्छाद मांडला होता. वाशी, कळंब व उस्मानाबाद तालुक्यात शेतमालाच्या चोरीचे गुन्हे सातत्याने घडत होते. परवाच कळंब तालुक्यातून एक आडत दुकान फोडून जवळपास ७ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. तरीही चोरटे गळाला लागत नव्हते. अखेर गुन्हे शाखेने खबऱ्याच्या माध्यमातून शेतमालाचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागमूस काढलाच. ढोकीजवळील राजेशनगर पेढीवरील काही चोरटे हा उद्योग करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर अधीक्षक संदीप पालवे, निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार आरसीपी प्लाटूनची मदत घेत उपनिरीक्षक पांडुरंग माने, उपनिरीक्षक भुजबळ, कर्मचारी ठाकूर, काझी, शेळके, सय्यद, चव्हाण, ढगारे, सर्जे, जाधवर, मरलापल्ले, आरसेवाड, आशमोड, गव्हाणे, माने यांच्या पथकाने या पेढीवर पहाटेच काेम्बिंग ऑपरेशन राबविले. तेव्हा ७ चोरटे या पथकाच्या गळाला लागले. त्यांच्याकडून शेतमाल, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ६ लाख ६० हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, त्यांच्याकडून शेतमाल खरेदी करणाऱ्या तेर येथील दोन आडत्यांनाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.

सहा ठाण्याचे पोलीस मागावर...

अटकेतील आरोपींनी वाशी, कळंब, येरमाळा, ढोकीसह उस्मानाबाद शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतही चोऱ्या केल्या होत्या. यामध्ये जबरी चोरीचाही समावेश आहे. घरात शिरुन, शेतातून, तसेच आडत दुकान फोडून या चोरट्यांनी शेतमाल लंपास केला होता. या प्रकारचे ६ ठाण्यात ९ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे सहा ठाण्याचे पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते.

हे आहेत आरोपी...

दादा उद्धव चव्हाण, अनिल उद्धव चव्हाण, युवराज राजाराम काळे, महादेव सुरेश चव्हाण, विकास उद्धव चव्हाण (सर्व रा. राजेशनगर पेढी, ढोकी), आबा आप्पा शिंदे (रा. मोहा पेढी), अंकुश कल्याण शिंदे (रा. ईटकुर) या सात चोरट्यांना गुन्हे शोखेने ताब्यात घेतले. हे सर्वच आरोपी १९ ते ३२ वयोगटातील आहेत. शिवाय, त्यांच्याकडून चोरीचा माल खरेदी करणारे तेर येथील सुधाकर जाधव व वैभव आप्पासाहेब आष्टेकर या आडत दुकानदारांनाही ताब्यात घेण्यात आले.

राजमा, सोयाबीन, हरभरे जप्त...

वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेलेला शेतमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये ७५ कट्टे हरभरा, ४७ कट्टे सोयाबीन, ३९ कट्टे राजमा, ८ कट्टे ज्वारी, किराणा सामान व गुन्ह्यात वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा ६ लाख ६० हजार ६०७ रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे.

Web Title: In the combing operation, 7 stolen goods including farm goods were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.