दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:29 PM2020-11-14T12:29:54+5:302020-11-14T12:30:55+5:30

तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

Comfortable! 134 crore in the account of the affected farmers | दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

दिलासादायक ! १३४ कोटी पोहोचले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील ९२ टक्के वाटप पूर्ण तीन दिवसांतच वितरणाची कार्यवाही

उस्मानाबाद : अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी शासनाने पहिल्या टप्प्यात १४५ कोटी रुपये सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले होते. यानंतर अत्यंत गतीने काम करून अवघ्या तीनच दिवसांत जवळपास १३४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत उर्वरित रक्कमही पूर्णपणे वितरित करण्याची प्रक्रिया सुरूच होती.

ऑक्टोबरच्या मध्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे २ लाख ६२ हजार हेक्टर्स शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे एसडीआरएफअंतर्गत मदत मागण्यात आली होती. दरम्यान, शासनाने ९ नोव्हेंबर रोजी नुकसानीपोटी पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाकडे जमा केला आहे. कोरडवाहू पिकांसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात अर्धी म्हणजेच १४५ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपये प्रशासनाकडे साेपविण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी तातडीने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही मदत शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना केल्या. तसेच नियमित आढावा घेतला. त्यामुळे अवघ्या तीनच दिवसांत प्राप्त निधीच्या ९२ टक्के रक्कम म्हणजेच १३३ कोटी ८४ लाख २५ हजार रुपये शुक्रवारी सकाळपर्यंत बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात  आले. 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळाला दिलासा 
रक्कम जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काहीअंशी का असेना दिलासा मिळाला आहे. शिवाय, प्रशासनाच्या या गतीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, मदत वाटपात वाशी तालुका आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात आलेले ४ कोटी ७८ लाख रुपये तालुक्यातील २५ हजार १९२ शेतकऱ्यांना वाटप केले आहेत.

Web Title: Comfortable! 134 crore in the account of the affected farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.