स्तुत्य उपक्रम! धाराशिव जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये आता ‘स्पाेकन इंग्लिश’ !
By बाबुराव चव्हाण | Published: October 12, 2023 04:57 PM2023-10-12T16:57:22+5:302023-10-12T16:57:32+5:30
जिल्हा परिषद व लिंक्स फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार
धाराशिव : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेतून संभाषण करण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, याकरिता आता धाराशिव जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पाेकन इंग्लिश’ हा उपक्रम राविण्यात येणार आहे. ओपन लिंक्स फाऊंडेशन आणि जिल्हा परिषदेत तसा सामंजस्य करारही झाला आहे.
एकीकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. शहरांसाेबतच ग्रामीण भागातही वर्षागणिक जाळे विस्तारू लागले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्येवर हाेवू लागला आहे. खाजगी शाळांचे हे आक्रमण थाेपविण्यासाठी आता मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून ‘टॅग इंग्लिश’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामाध्यमातून प्रत्येक शाळेत आता ‘स्पाेकन इंग्लिश’ सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेने ओपन लिंक्स फाऊंडेशन साेबत सामंजस्य करारही केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अवघ्या २५ तासांमध्ये इंग्रजी बाेलण्याचा सराव आणि काैशल्य निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, जे शिक्षण या उपक्रमात झाेकून देत काम करतील, त्यांना प्रत्येक महिन्याकाठी बक्षिसेही दिली जाणार आहेत.
‘स्पाेकन इंग्लिश’ कशासाठी?
जिल्हा परिषद शाळांमतील मुलांना २५ तासांमध्ये इंग्रजी बाेलण्याचा सराव व्हावा, त्याच्यातील इंग्रजी बाेलण्याची भीती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना सहजरित्या स्वतःबद्दल इंग्रजी भाषेतून सांगता यावे, इंग्रजीच्या किमान ५०० शब्दांचा शब्दकाेष तयार व्हावा, विद्यार्थ्यांत इंग्रजी भाषेतून संभाषण करण्यासाठीचा आत्मविश्वास दृढ व्हावा हा या स्पाेकन इंग्लिश उपक्रम हाती घेण्यामागचा उद्देश आहे.
रिझल्ट द्या, बक्षिसे जिंका...
शाळांमधील होणारे चांगले कार्य, तसेच मुलांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणारे शिक्षक तसेच शाळांना प्राेत्साहन देण्यासाठी दरमहा बक्षीस वितरण समारंभ हाेणार आहे. जिल्हा पातळीवर तीन तर तालुका पातळीवर एक बक्षीस दिले जाणार आहे, असे ओपन लिंक्स फाऊंडेशनकडून सांगण्यात आले.
इंग्रजीची भिती घालविणे हा उद्देश
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आता स्पाेकन इंग्लिश हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भिती घालविणे हा, एकमेव उद्देश उपक्रम राबविण्यामागे आहे. उल्लेखनीय काम करणारे शिक्षक, शाळांच्या पाठीवर बक्षीसरूपी काैतुकाची थापही दिली जाणार आहे.
-राहुल गुप्ता, सीईओ, जिल्हा परिषद, धाराशिव.