तृतीयपंथीय व्यक्तींना जमीन देण्याच्या मुद्द्यावर समितीत ‘एकमत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:27 AM2021-07-25T04:27:01+5:302021-07-25T04:27:01+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या ...
उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आला हाेता. या अनुषंगाने ‘एकमत’ झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगाकवर यांनी समाज कल्याण आयुक्तांचे मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश समिती सचिव तथा सहाय्यक अयुक्त बी. जी. अरवत यांना दिले. आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी हक्काचे साधन उपलब्ध हाेणार आहे.
तृतीयपंथीय यांच्या समस्या तसेच तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तृतीयपंथीय यांच्या नाेंदणीसंदर्भात सुरुवातीला चर्चा झाली. याबाबत समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी तसे निर्देश सहाय्यक आयुक्त तथा समिती सचिव अरवत यांना देण्यात आले. यानंतर समिती सदस्य कलीम आयुब कागदी यांनी तृतीयपंथीय यांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान याेजनेच्या माध्यमातून कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना याेजनेचा लाभ देताना जातीचा विचार केला जात नाही, त्याप्रमाणेच तृतीयपंथीय यांच्याबाबतही विचार व्हावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. समितीतही त्यांच्या या मागणीवर एकमत झाले. यानंतर समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अरवत यांना दिले.
दरम्यान, उपराेक्त विषयास आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास अशा प्रकारची याेजना हाती घेणारा उस्मानाबाद हा राज्यातील पहिला जिल्हा ठरू शकताे.
चाैकट...
नाेंदणी झाल्यानंतर तृतीयपंथीय यांना विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते काढणे, काेविड लसीकरण उपलब्ध करून देणे, बचतगट तयार करणे, घरकुल याेजनेचा लाभ देणे, महामंडळ तसेच बॅंकांकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथीय यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. आरवत यांनी सांगितले.