वांझोटे बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांची गय केली जाणार नाही; कृषी मंत्र्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:58 PM2020-06-22T16:58:17+5:302020-06-22T17:01:56+5:30
कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. असा दिलासा दिला
कळंब (जि. उस्मानाबाद) : मामा... तुम्ही काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे. महाबीज असो की अन्य कंपनी. चौकशीत जे कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई होणार, असा कडक इशारा देत वांझोट्या बियाणामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी दिलासा दिला.
कळंब तालुक्यातील प्रमूख पीक हे सोयाबीन आहे. अशा या पिकाच्या उगवणक्षमतेसंदर्भात यंदा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. बियाणं वांझोट ठरल्याने शेतकऱ्यांची मेहनत तर वाया गेली आहे, शिवाय वेळ व पैसा याचाही अपव्यय झाला आहे. नुकसानीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यास्थितीत सोमवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी तालुक्यातील बागंरवाडी गावाचा दौरा केला. यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात गंभीर तक्रारी समोर येत असलेल्या बांगरवाडी येथील चांगदेव रघुनाथ बांगर या शेतकऱ्याच्या शेताची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली.
यावेळी आपल्या ६० गुंठे क्षेत्रात उगवण न झाल्याने नुकसान झाल्याचे तर गावातील इतर शेतकऱ्यांनीही गाव शिवारातील ५० टक्के क्षेत्रावर पेरणी फिरल्याने दुबार पेरणीचे संकट उभं ठाकल्याची व्यथा मांडली. यावेळी कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी संबंधित शेतकऱ्यांना धीर देत काळजी करु नका, सरकार आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. यात महाबीज असो की अन्य कोणती कंपनी, जो कोणी दोषी आहे, त्यावर कारवाई होईलच असा ईशारा देत आश्वस्त केलं.
मंत्री थेट काळ्या वावरात...
सोयाबीनच्या कोठारात सोयाबीन उगवणक्षमता संदर्भात तक्रारी समोर येत आहेत. यात केवळ पेरणीचा हिशोब पकडला तर एकरी साडेपाच हजाराला शेतकरी खपला जात आहे. ही बाब ‘लोकमत’ सलग तीन दिवसांपासून मांडत आहे. दरम्यान, आज या गंभीर विषयाचे गांभीर्य लक्षात राज्याचे कृषि मंत्री दादाजी भूसे हे बांगरवाडी येथे थेट शेतकऱ्यांच्या काळ्या वावरात उतरले. याठिकाणी त्यांनी जमिनीत बिजारोपण केलेल्या व अद्याप बिंजाकूर न झालेल्या बियाण्याची पाहणी केली. कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ, खासदार, आमदार, स्थानीक शेतकरी व संबंधीत शेतकरी यांच्याशी संवाद साधला. याबद्दल समाधान व्यक्त केले जात होते.