तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:03 PM2018-10-24T18:03:13+5:302018-10-24T18:10:25+5:30

नवरात्रौत्सवानंतर सुरु झालेली तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा अश्विनी पौर्णिमेला संपुष्टात आली़

Complete five-day Shramnidra of Tulja Bhavani Devi | तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा पूर्ण

तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा पूर्ण

googlenewsNext

तुळजापूर ( उस्मानाबाद) : नवरात्रौत्सवानंतर सुरु झालेली तुळजाभवानी देवीची पाच दिवसीय श्रमनिद्रा अश्विनी पौर्णिमेला संपुष्टात आली़ यानिमित्त बुधवारी पहाटे मूर्ती मंचकावरुन वाजत-गाजत आणून पूर्ववत् मंदिरात सिंहासनस्थ करण्यात आली़ हे औचित्य साधण्यासाठी मंगळवारी रात्रीच लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले होते़

आज पहाटे एक वाजता भक्तीमय वातावरणात श्री तुळजाभवानीच्या मंचकावरील निर्माल्य, मांगल्य साफ करून जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे व भारती गमे तसेच भोपे पुजारी यांनी मानाच्या आरत्या केल्या़ यानंतर देवीस मंचकावरून सिंहासनावर पूर्व प्रतिष्ठापना केली. यावेळी धार्मिक विधी होऊन देवीची पंचारती करण्यात आली व लगेचच विशेष अभिषेक पूजेस प्रारंभ झाला. ही पूजा पार पडल्यानंतर पहाटे सहा वाजता नेहमीचा अभिषेक घाट होऊन दैनंदिन अभिषेक  झाला़ यानंतर भोपे पुजारी यांनी श्री तुळजाभवानीची विशेष अलंकार महापूजा मांडली. नैवेद्य, धूप आरती, अंगारा हे विधी पार पडले.

यावेळी देवीचे चारही महंत, भोपे पुजारी विशाल सोनजी, अमरराजे परमेश्वर, संतोष परमेश्वर, सचिन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, सिद्धेश्वर इंतुले, नगरच्या पालखीचे मानकरी भगत, पलंगाचे मानकरी पलंगे, सेवेकरी, आवटी, छत्रे, पलंगे, चोपदार, पवेकर, पुजारी, गोंधळी व मंदिर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर सायंकाळची नित्य अभिषेक पूजा संपल्यानंतर सोलापूर येथून आलेल्या तेली समाजाच्या मानाच्या काठ्या बरोबर तुळजाभवानीचा छबिना होऊन महंताच्या जोगव्याने अश्विनी पौर्णिमेच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली. हे औचित्य साधण्यासाठी विविध राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी तुळजापुरात हजेरी लावली़

Web Title: Complete five-day Shramnidra of Tulja Bhavani Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.