बोरी नदीच्या सात किमीचे खोलीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:34 AM2021-03-23T04:34:34+5:302021-03-23T04:34:34+5:30
(फोटो : गोविंद खुरूद २३) तुळजापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज शंकराव शहाणे यांच्या प्रयत्नातून व स्वखर्चातून सुरू झालेल्या ...
(फोटो : गोविंद खुरूद २३)
तुळजापूर : येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज शंकराव शहाणे यांच्या प्रयत्नातून व स्वखर्चातून सुरू झालेल्या बोरी नदी खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाने जवळपास सात कि.मी.चा टप्पा ओलांडला आहे. आईने दिलेल्या पेन्शनमधील २५ हजार व स्वतःच्या खिशातील २५ हजार रुपये घालून या कामास त्यांनी प्रारंभ केला आहे. मागील ३२ दिवसांपासून हे काम सुरू आहे. शहाणे यांच्या या उपक्रमाला हळूहळू शहरातील व ग्रामीण भागातील अनेक दानशूर व्यक्तींनीदेखील आर्थिक मदतीचा हात दिल्यामुळे बोरी नदीच्या उगमापासून सुरू झालेले काम आज सात किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे.
तुळजापूर, नळदुर्ग, आंदुर व १४ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणाची मुख्य जलवाहिनी म्हणून बोरी नदी ओळखली जाते. या नदीचा उगम तुळजापूर तालुक्यातील बोरी येथून होतो. तुळजापूर खुर्द, हंगरगा, बारुळ, देवसिंगा आदी परिसरातून वाहत ही नदी नळदुर्गकडे जाते. या नदीच्या उगमाच्या ठिकाणी अत्यंत दुरवस्था झाली होती. या नदीचे पात्र पूर्णतः दगड गोटे व गाळाने भरून गेले होते. काटेरी झुडपांनी नदी पूर्णतः दिसेनाशी झाली होती. परंतु, ही बाब सामाजिक कार्यकर्ते, जलदूत पंकज शहाणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम हातात घेऊन त्याला तडीस नेण्यासाठी मित्र परिवारास या कामी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जवळपास मागील ३० दिवसांपासून बोरी नदीचे हे खोलीकरण व सरळीकरण विनाथांबा सुरू आहे. या दिवसात उगमापासून जवळपास ७ किलोमीटर बोरी नदीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी काही ठिकाणी तीन फूट खोल तर काही ठिकाणी सात फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. यातून उपसलेला गाळ संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर टाकण्यात आला आहे. आत्तापर्यंत केलेल्या कामामुळे जलतज्ञांच्या माहितीनुसार ११ कोटी लीटर पाणीसाठा वाढणार असून, याचा फायदा संबंधित शेतकऱ्यांना व शहरवासीयांच्या कूपनलिकेला होणार आहे.
आमदारांनीही घेतली दखल
पंकज शहाणे यांच्या कामाचे दखल राज्यातील विविध जलतज्ञांनी व समित्यांनी घेऊन प्रत्यक्ष शहाणे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे.
जलदूत पंकज शहाणे यांच्या कामाची दखल घेऊन तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील आमदार निधीतून तीन लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. तो निधी उपलब्ध झाल्यास आणखीन या कामास गती मिळेल. पुढील कामास हातभार लागेल, असे मत समाजसेवक पंकज शहाणे यांनी व्यक्त केले.
(कॅप्शन : तुळजापूर येथील पंकज शहाणे यांनी स्वखर्चातून बोरी नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याला पुढे लोकवर्गणीचाही हातभार लागल्याने सुमारे सात किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले आहे.)