घरकुलाच्या बिलासाठी लाच घेणारा संगणक ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 06:57 PM2019-02-06T18:57:04+5:302019-02-06T18:57:30+5:30
तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपयांची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़
उस्मानाबाद : घरकूल कामाचे बील काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी ५०० रूपयांची मागणी करून ती स्विकारणाऱ्या संगणक ऑपरेटरवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली़ ही कारवाई बुधवारी सकाळी उमरगा येथील पंचायत समितीत करण्यात आली़
एका तक्रारदाराच्या आईच्या नावाने घरकूल मंजूर आहे़ मंजूर घरकुलाचे बील काढण्याची आॅनलाईन कार्यवाही करण्यासाठी संबंधिताने उमरगा पंचायत समितीतील संगणक आॅपरेटर सचिन दत्तात्रय देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ या कामासाठी संगणक आॅपरेटर ५०० रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार संबंधिताने उस्मानाबाद येथील लाचलचूपत प्रतिबंधक विभागाकडे (ए़सी़बी़) दिली होती.
या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक डॉ़ श्रीकांत परोपकारी, पोलीस उपाधीक्षक बी़व्हीग़ावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बी़जी़आघाव यांनी तक्रारीची शहानिशा केली़ त्यानंतर गुरूवारी उमरगा पंचायत समितीतील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला़ त्यावेळी संगणक चालक सचिन दत्तात्रय देशमुख याने तक्रारदाराच्या कामासाठी ५०० रूपयांची मागणी करून ती स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे़