काॅंग्रेसतर्फे दररोज ७०० जणांना केले जातेय अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:43+5:302021-05-13T04:32:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरगा : कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्ण व नातेवाईकांची लॉकडाऊनमुळे जेवणाची अडचण होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : कोरोना संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्ण व नातेवाईकांची लॉकडाऊनमुळे जेवणाची अडचण होत आहे. ही बाब लक्षात येताच काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून उमरगा व लोहारा तालुक्यातील ७०० जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारच्या सत्रात सरकारी, खासगी कोविड सेंटर व कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्ण व नातेवाईकांपर्यंत जेवणाचा डबा पोहोच करत आहेत.
उमरगा, लोहारा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग गतीने वाढला आणि अनेकांना त्याची बाधा झाली. गरीब कुटुंबातील अनेक रूग्णांना उपचारासाठी अडचणी निर्माण होत असल्याने काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी आमदार बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय करून कोरोनासंदर्भात मदत केंद्र सुरू केले. कार्यकर्त्यांनी नागरिक व रूग्णांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उपचारासाठी दाखल झालेल्या शहर व परगावच्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची जेवणासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन तालुका काँग्रेस समितीच्यावतीने १ मेपासून उमरगा शहरातील उपजिल्हा रूग्णालय, सात खासगी कोविड सेंटर व दोन कोरोना केअर सेंटर आणि लोहारा तालुक्यातील दोन कोरोना केअर सेंटर येथे दररोज तब्बल ७०० जणांपर्यंत कार्यकर्ते जेवणाचा डबा पोहोच करत आहेत.
मुरूम येथे आचाऱ्यांमार्फत दर्जेदार जेवणाची तयारी पहाटेपासूनच सुरू असते. ११ वाजल्यानंतर जेवणाचे पार्सल डबे वाहनातून थेट रूग्णालयापर्यंत पोहोच केले जातात. मुरूम बाजार समितीचे सभापती बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते शरण पाटील हे अन्नदानाचे काम सुरळीत ठेवण्यासाठी लक्ष देऊन पाहणी करतात. जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव हे महिनाभरापासून कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. कोरोनाचा संसर्ग संपेपर्यंत अन्नदानाचे कार्य सुरू राहणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
तालुका काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, नगराध्यक्ष प्रेमलता टोपगे, मुरूम पालिकेच्या नगराध्यक्ष अनिता अंबर, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार, नगरसेवक महेश माशाळकर, विक्रम मस्के, विजय वाघमारे, उल्हास घुरघरे, राजू मुल्ला, परमेश्वर टोपगे, अनिल सगर, सोहेल इनामदार, चंद्रकांत मजगे, जीवन सरपे, बाबा मस्के, व्यंकट पवार, बालाजी पवार, तुकशेट्टी, राहुल स्वामी, आदी कार्यकर्ते रूग्णालयात जाऊन जेवणाच्या डब्यांचे वितरण करतात.
(चाैकट)
कोरोनाच्या संकटाने अनेक कुटुंबांवर आघात केला आहे. बाधित व्यक्तींना योग्य उपचार मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. कोविडने गंभीर झालेल्या अनेक रूग्णांच्या उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून केला जातोय. संकटात अनेकजण माणुसकीतून काम करत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीने राज्यभर रक्तदान शिबिरे घेऊन रक्तसंकलन केले, त्याचा अनेकांना फायदा होतोय. शिवाय, उमरगा - लोहारा तालुक्यात कार्यकर्त्यांनी रूग्ण व नातेवाईकांना अन्नदानाचे काम सुरू केल्याने सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
- बसवराज पाटील, कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस समिती
फोटो- उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना जेवणाचा डबा देताना शरण पाटील, दिलीप भालेराव, विजय वाघमारे, विक्रम मस्के, आदी कार्यकर्ते.