बालेकिल्ल्यात काँग्रेसला पडतेय खिंडार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:23 AM2021-06-25T04:23:35+5:302021-06-25T04:23:35+5:30
लोहारा : शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत ...
लोहारा : शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच काँग्रेसचा अजून एक गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असलेल्या शहरात काँग्रेसला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी उमरगा-लोहारा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी ते राज्यमंत्री होते. परंतु, हा मतदारसंघ आरक्षित झाला आणि त्यांनी औसा विधानसभा निवडणूक लढविली. दोन टर्म ते औशाचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांचे लोहारा शहरासह तालुक्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले असल्याचे काँग्रेसचेच कार्यकर्ते सांगत असले तरी, ते प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही तालुक्यात चांगले यश मिळत होते. परंतु, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित झाल्यापासून काँग्रेसला गड राखण्यात यश आले नाही.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त गुरुवारी तुळजापूर येथे आले असताना लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील व त्यांचे नातू विश्वजित वकील-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वकील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसपासून केली होती. त्यांनी उमरगा पंचायत समितीचे सदस्य, मुरुम बाजार समितीचे संचालक, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष, लोहारा शहराचे सरपंच, काँग्रेस पक्षाच्या अनेक पदांवर काम केले आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काँग्रेसचा आणखी एक गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता शहरात चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसला शहरासह तालुक्यात फटका बसणार असला तरी लोहारा नगरपंचायत निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत यांचा किती प्रभाव पडणार, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.