पाच महिन्यांपूर्वी मंजुरी मिळालेल्या वीज उपकेंद्र उभारणीला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 02:24 PM2021-02-16T14:24:08+5:302021-02-16T14:25:56+5:30
फुलवाडी उपकेंद्रावरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन जवळपास पाच महिन्यांपूर्वी पुजारी तांडा येथे नवीन स्वतंत्र उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली.
अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील फुलवाडी वीज उपकेंद्रावर भार वाढल्याने वीजपुरवठा विस्कळीत होत आहे. यामुळे पुजारी तांडा येथे नवीन वीज उपकेंद्रास जवळपास पाच महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली. परंतु, या उपकेंद्राच्या उभारणीबाबत पुढील कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने हा प्रश्न रखडला आहे.
अणदूर विभागातील फुलवाडी उपकेंद्राची क्षमता पाच एमव्हीए आहे. या उपकेंद्रांतर्गत फुलवाडी, अणदूर, उमरगा, चिवरी, खुदावाडी या गावांना विद्युतपुरवठा होत असतो. परंतु, यावर क्षमतेपेक्षा अधिक भार असल्यामुळे परिसरातील १० ते १२ डीपी बंद करून विद्युतपुरवठा सुरू ठेवावा लागत आहे. त्यामुळे शेतातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय, गावातील विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांचीदेखील गैरसोय होत आहे. फुलवाडी उपकेंद्रावरील अतिरिक्त भार लक्षात घेऊन जवळपास पाच महिन्यांपूर्वी पुजारी तांडा येथे नवीन स्वतंत्र उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. या अनुषंगाने महावितरणने जागादेखील ताब्यात घेतली. परंतु, पुढे याची कार्यवाही ठप्प झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हे उपकेंद्र त्वरित उभे करावे, अशी मागणी होत आहे.
अभियंतापद रिक्त
गेल्या चार-पाच महिन्यांपासून अणदूर येथील अभियंत्याचे पद रिक्त असून, येथील पदभार तुळजापूर येथील अभियंत्यांकडे देण्यात आला आहे. परंतु, त्यांना तेथील कामकाज पाहून अणदूरकडे लक्ष देणे कठीण होत आहे. परिणामी, ग्राहकांच्या वीजबिलाच्या अडचणी, वीजपुरवठ्यातील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय, अणदूर, नळदुर्ग येथे वीजबिल भरणा केंद्र नाही. त्यामुळे बिल भरण्यासह कुठलाही बिघाड झाल्यास ग्रामस्थांना तुळजापूरला जावे लागते. त्यासाठी अणदूर येथील अभियंत्याचे पद कायमस्वरूपी भरण्याची गरज व्यक्त होत आहे.
लवकरच हे काम सुरू होईल
नव्याने मंजूर झालेल्या उपकेंद्राचे काम लातूरच्या पथकाकडे आहे. या उपकेंद्रासाठी पुजारी तांड्यावरील जागा ताब्यात घेऊन टेंडर ऑर्डरही फायनल झाली आहे. लवकरच हे काम सुरू होईल. अणदूर येथील अभियंतापद रिक्त असल्याने तुळजापूर येथील अभियंत्यांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ग्राहकांना अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांची कागदपत्रे मागवून घेऊन तत्काळ कार्यवाही केली जात आहे. फक्त काही कामांना एखादा- दुसरा दिवस विलंब होत आहे. येथील पदही लवकरच भरून गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- एस.व्ही. गोदे, उपकार्यकारी अभियंता, तुळजापूर