मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद; कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ५ तास पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 02:33 PM2021-05-04T14:33:27+5:302021-05-04T14:40:54+5:30

corona virus : उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील छगन सोनटक्के (६५) हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले होते.

Contempt from the funeral! Death of a corona patients; The body lay at the door of the hospital for 5 hours | मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद; कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ५ तास पडून

मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद; कोरोनाबाधिताचा मृतदेह रुग्णालयाच्या दारात ५ तास पडून

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यातील दुर्दैवी प्रकार  कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतरही अवहेलना

तेर (जि.उस्मानाबाद) : खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा दारातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथे घडली. यानंतर मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद सुरू झाल्याने तब्बल पाच तास हा मृतदेह खासगी रुग्णालयाच्या दारातच पडून होता. अखेर ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेऊन दुपारी मृतदेह नेत खबरदारी घेऊन अंत्यविधी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील छगन सोनटक्के (६५) हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने ताबडतोब उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथून बाहेर पडतानाच छगन सोनटक्के पायरीजवळ पडले ते निपचितच. कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जवळपासही कोणी फिरकायला तयार नव्हते. ही बाब तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यास बोलावून रॅपिड टेस्ट करायला लावली. त्यात छगन सोनटक्के हे बाधित आढळून आले. त्यानंतर मृतदेह पॅक करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास कळविण्यात आले; मात्र हा प्रकार रुग्णालयाबाहेर घडल्याने मदत करता येणार नाही, अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली होती;मात्र नंतर मयताचा एक नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह पॅक केला. 

यानंतर हा मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा यावरुन चर्वण सुरु झाले. सुरुवातीला किणी ग्रामपंचायतीनेही मृतदेह न्यायला नकार दिला. मग तेर ग्रामपंचायतीनेही ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थतता दर्शविली. नातेवाईकांनी एखादे वाहन दिल्यास आपणच मृतदेह नेऊ, अशी भूमिका मांडली. तेव्हा किणीच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन मृतदेह सर्व खबरदारी घेत गावाकडे नेला. मात्र, तोपर्यंत जवळपास पाच तास उलटून गेले होते. सायंकाळी या मृतदेहावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतरही त्यांची कशी अवहेलना होत आहे, याचा प्रत्यय या घटनेने सोमवारी आणून दिला.

Web Title: Contempt from the funeral! Death of a corona patients; The body lay at the door of the hospital for 5 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.