वेतनासाठी कंत्राटी वीज कामगार बसले उपोषणाला
By सूरज पाचपिंडे | Updated: September 8, 2023 17:47 IST2023-09-08T17:47:21+5:302023-09-08T17:47:31+5:30
एजन्सींचे टेंडर रद्द करण्याची मागणी करत कामगारांचे आंदोलन

वेतनासाठी कंत्राटी वीज कामगार बसले उपोषणाला
धाराशिव : जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने कंत्राटी वीज कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. थकीत वेतन त्वरीत खात्यात जमा करावे, तसेच नियुक्ती पत्र न देणाऱ्या एजन्सीचे टेंडर रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी कंत्राटी वीज कामगार शुक्रवारपासून धाराशिव येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
जिल्ह्यात तीन एजन्सीद्वारे महावितरण विभागाला कंत्राटी कामगाराचा पुरवठा केला जातो. इतर दोन एजन्सीकडून कामगारांना नियुक्तीपत्र देऊन वेतनही महिन्याला केले जात आहे. मात्र, भूम, परंडा, तेर उपविभागातील वीज कंत्राटी कामगारांचे वेतन आजुबाई इलेक्ट्रिकल्स या एजन्सींकडून केले जात नसल्याचा आरोप करीत वीज कंत्राटी कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वेतन वेळेवर न करणाऱ्या व नियुक्त पत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आजुबाई इलेक्ट्रिकल्स या एजन्सींचे टेंडर रद्द करावे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरली होती. आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे उपाध्यक्ष सुशिल उपळकर, जिल्हाध्यक्ष मारुती गुंड, दिनेश सांगडे यांच्यासह कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यां कामगारांनी घेतला आहे.