कोरोनामुळे शेतात मुक्कामी गेलेल्या कुटुंबावर झाडाची फांदी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:49+5:302021-04-28T04:34:49+5:30
तामलवाडी : गावात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने घराला कुलूप लावून शेतात रहायला गेलेल्या कुटुंबाच्या पालावर झाडाची फांदी कोसळल्याची घटना ...
तामलवाडी : गावात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने घराला कुलूप लावून शेतात रहायला गेलेल्या कुटुंबाच्या पालावर झाडाची फांदी कोसळल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी शिवारात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी पालात सहा जण होते. परंतु, सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. मात्र उदरनिर्वाहासाठी आणलेले अन्नधान्य मातीत मिसळून नुकसान झाले.
गंजेवाडी गावात मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे याच धास्तीने गावातील १५० कुटुंबांनी गाव सोडून शेतात बिऱ्हाड हलविले आहे. त्यात आबाराव गंजे यांनी शेतात निवाऱ्याची सोय नसल्याने त्यानी कुटुंबाचा मुक्काम आंब्याच्या झाडाखाली ठोकला आहे. पाऊस, वाऱ्याचा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी झाडाशेजारी ताडपत्रीचे पाल ठोकले असून, या ठिकाणी स्वयंपाक बनविण्याची सोय केली. नंतर त्याच पालामध्ये सहा जण झोपतात. सोमवारी रात्री झालेल्या वादळी वारे पावसात वाऱ्याने अचानक आंब्याच्या झाडाची फांदी या पालावर कोसळली. या घटनेत आबाराव गंजे (वय ४८), रामचंद्र गंजे (वय ८४), राणुबाई गंजे ( वय ७५), शीतल गंजे (वय ४२), ओम गंजे (वय १६) व श्रीराम गंजे (वय ६) हे सहाजण बालंबाल बचावले. पालावर झाडाची फांदी पडल्याने कसेबसे बाहेर पडून त्यांनी स्वत:चा जीव वाचविला. परंतु, उदरनिर्वाहासाठी आणलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले. एकीकडे कोरोना धास्ती तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, वाऱ्याचे संकट शेताकडे राहण्यासाठी गेलेल्या कुटुंबासमोर उभे राहत असल्याने गावकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चौकट
तारांमुळे वाचला जीव
आंब्याच्या झाडाशेजारी द्राक्षाच्या उभारणीसाठी लोखंडी तारेचे फाऊंडेशन मारलेले होते. सोमवारी रात्री गंजे कुटुंब ज्या ताडपत्रीच्या पालात झोपले होते, त्या ठिकाणी फांदी कोसळली. मात्र लोखंडी तारेमुळे फांदी जमिनीवर पडता पडता तारेवर अडकून बसली. या घटनेत पाल भुईसपाट झाले. परंतु, सहा जणांचा जीव वाचला.