एका महिन्यात तोडली कोरोनाची साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:33 AM2021-05-27T04:33:47+5:302021-05-27T04:33:47+5:30
बाबू खामकर पाथरुड : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील जवळपास सर्वच गावांना बाधित केल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ...
बाबू खामकर
पाथरुड : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातील जवळपास सर्वच गावांना बाधित केल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आपले गाव कोरोनामुक्त होण्यासाठी अनेक गावे गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष करीत आहेत. भूम तालुक्यातील आनंदवाडी गावातही तब्बल ५१ रुग्ण बाधित होते. परंतु, १५ दिवसांचे कडक लॉकडाऊन आणि ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने अवघ्या महिनाभरात या गावाने कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळविले. सद्य:स्थितीत येथे एकही कोरोना रुग्ण नाही.
भूम तालुक्यातील आनंदवाडी गावाने पहिल्या लाटेत कोरोनाला वेशीवरच रोखले होते. मात्र दुसऱ्या लाटेत गावात कोरोनाचे मार्च महिन्यात आगमन झाले व एप्रिल महिन्यात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊन ५१ जणांना कोरोनाची बाधा झाली. यामुळे ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाकडून गावात १५ दिवसांची कडक संचारबंदी लावण्यात आली. विशेषत: ग्रामस्थांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने ५१ कोरोना रुग्ण सापडूनही अवघ्या एका महिन्यातच कोरोनाची साखळी तोडून एकाही रुग्णाचा मृत्यू न होता आनंदवाडी गाव कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले.
कोरोनामुक्त गाव होण्यासाठी गावकऱ्यांचेही प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत. हेच प्रयत्न आनंदवाडी येथील ग्रामस्थांकडून झाले. गावात कुठेही गर्दी टाळणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे असे सर्वच कोरोनाचे नियम काटेकोर पाळले गेल्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करण्यात यश आले. यामुळे इतर गावांसाठी ही बाब आदर्शवत ठरली आहे.
चौकट.........
आम्ही केलेल्या आवाहनाला आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी प्रतिसाद देत नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश आले आहे. इतरही गावांनीही असेच कोरोना नियमांचे पालन करून आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावे.
- उषाकिरण श्रृंगारे, तहसीलदार, भूम
कोरोना नियमांचे ग्रामस्थांकडून काटेकोरपणे पालन झाल्याने आनंदवाडी गाव कोरोनामुक्त झाले आहे. परंतु, सध्या गावात रुग्ण नसला तरी ग्रामस्थांनी ही काळजी यापुढेही कायमस्वरूपी घेत राहणे गरजेचे आहे.
- सुशेन खंदारे, ग्रामसेवक, आनंदवाडी
गावातील प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेतल्याने कोरोनाची वाढणारी साखळी तोडण्यास मदत झाली. सध्या आनंदवाडी गाव कोरोनामुक्त झाले असून, यापुढेही ग्रामस्थांनी अशीच विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- धनराज वनवे, पोलीस पाटील, आनंदवाडी