कोरोनाने हिरावले ५७ मुलांचे पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:32 AM2021-05-26T04:32:36+5:302021-05-26T04:32:36+5:30
उस्मानाबाद : आतापर्यंत कोरोनाचे संकट हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांवर कहर ठरत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रौढांची संख्या मोठ्या प्रमाणात ...
उस्मानाबाद : आतापर्यंत कोरोनाचे संकट हे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांवर कहर ठरत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत प्रौढांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांनी आपली लहान बालके पाठिशी ठेवून जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अशा बालकांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मदत व्हावी, याअनुषंगाने जिल्ह्यात आता सर्वे सुरु झाला असून, आईवडील दोघेही किंबहुना आई किंवा वडील मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा शोध घेतला जात आहे.
जिल्ह्यात आजवर कोरोनामुळे साडेअकराशे पेक्षाही जास्त बळी गेले आहेत. पहिल्या लाटेत मृत्युमुखी पडणारे सर्वाधिक हे ज्येष्ठ नागरिक होते. मात्र, आता दुसऱ्या लाटेत प्रौढांचे प्रमाणही चांगलेच वाढीस लागले आहे. परिणामी, त्यांच्या लहान बालकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अशा बालकांचा शोध घेण्यात येत आहे. ज्यांचे पालक कोरोनाने हिरावले आहेत, त्यांना आर्थिक, शैक्षणिक आधार देण्याच्या अनुषंगाने ही शोधमोहिम सुरु असून, आतापर्यंत ५७ बालके आढळून आली आहेत. सर्वे पूर्णत्वाकडे जाईल, तसा हा आकडा आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास ११०० रुपयांची मदत...
कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा किंबहुना दोघांचाही मृत्यू झाला असल्यास अशा बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंगोपन योजनेतून मदत करण्यात येणार आहे.
या योजनेतून यापूर्वी ४२५ रुपयांची मदत मिळत होती. आता सरकारने ही मदत दरमहा अकराशे रुपयांपर्यंत वाढवली आहे.
बालकल्याण विभाग अशा बालकांचा अहवाल बाल समितीसमोर सादर करेल. नातेवाईक सांभाळ करण्यास तयार झाले तर त्यांना अकराशे रुपयांची मदत वर्षभर मिळणार आहे.
या अनाथ मुलांचे सरकार करणार काय...
सध्या कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावोगाव घेतला जात आहे. यातून अनाथ आढळून येणाऱ्या मुलाची संपूर्ण कौटुंबिक माहिती एकत्रित केली जाणार आहे.
ज्या मुलाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राहण्यास घर नाही किंवा सांभाळ करणारेही कोणी नाहीत, अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बाल समितीच्या माध्यमातून बालगृह, बालकाश्रमात ठेवले जाईल.
पाठिशी कोणताही आर्थिक आधार नसल्यास शासनच या बालकांच्या पुनर्वसनाचा भार उचलण्याची शक्यता आहे.
कोट...
सध्या एक पालक किंवा अनाथ झालेल्या बालकांचा शोध सर्वेक्षणातून घेतला जात आहे. आतापर्यंत अशी ५७ बालके आढळली आहेत. आणखीही शोध सुरुच आहे. या सर्व बालकांचा अहवाल तयार करुन बाल समितीसमोर सादर केला जाणार आहे. त्या-त्या बालकांची परिस्थिती, गरज लक्षात घेऊन मदत, पुनर्वसनाबाबत बालसमिती योग्य तो निर्णय घेईल.
- बळीराम निपाणीकर, महिला व बालविकास अधिकारी