कोरोना इफेक्ट, बाजार समितीतील आवक प्रचंड मंदावली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:19+5:302021-05-05T04:54:19+5:30
कळंब : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य ...
कळंब : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य खरेदी-विक्रीला ब्रेक लागला आहे. बाजार समितीमध्ये दिवसाकाठी फक्त ५० ते १०० क्विंटल धान्य खरेदी होते आहे.
खरीप हंगाम जसा जवळ येत आहे तशी बाजार समितीमध्ये आवक वाढेल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला तर पेरणीला सुरुवात होते. त्याच्या बी बियाणे तसेच खतांच्या तजवीजीसाठी शेतकरी वर्ग धान्य विक्रीसाठी आणतात. तसेच ज्वारी, हरभरा, गहू काढणीही झाली असल्याने तो शेतमाल विक्रीसाठी येईल असा बाजाराचा अंदाज होता.
शासनाने शेतीमालाच्या खरेदी-विक्रीला निर्बंधातून सूट दिली आहे. बाजार समितीचे कामकाजही चालू आहे. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कळंब बाजार समितीमधील धान्याची आवक प्रचंड घटली आहे. जेथे दिवसाकाठी धान्याची आवक हजार क्विंटलच्या घरात जायची तेथे आता ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक घसरली आहे.
सध्या प्रामुख्याने ज्वारी, हरभरा व गव्हाची आवक आहे. ज्वारीला २००० ते २२००, हरभरा ४९०० ते ५०५० प्रती क्विंटल भाव आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये हरभरा व ज्वारीची फक्त ७६ क्विंटल आवक नोंदविली गेली आहे. यावरूनच बाजारात कोरोना संसर्गाच्या तसेच प्रशासनाच्या कार्यवाहीच्या धास्तीने शेतकरीवर्ग धान्य विक्री करण्यासाठी बाजार समिती परिसरात येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
चौकट -
व्यापारी प्रतिक्रिया
सध्या कोरोना संसर्गामुळे शेतकरी वर्ग धान्य विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे. यामुळे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या वाहनांना अडवाअडवीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. व्यापारी वर्गाला तुम्ही शेतकरी कशाला जमविले म्हणून दंड लावला जात आहे. एकूणच सर्व परिस्थिती विपरीत असल्याने बाजार समितीमधील धान्याची आवक घटली आहे. परिस्थिती सामान्य झाली की आवक वाढेल.
- लक्ष्मण कोल्हे, आडत व्यापारी.
बाजार समिती परिसरात अभूतपूर्व शांतता आहे. ही वेळ दरवर्षी मोठ्या उलाढालीची असते; पण यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे धान्याची आवक थंडावली आहे परिणामी सौदेही होत नाहीत. त्यामुळे धान्याला उठाव नाही तसेच भावही मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा आवक वाढेल
आनंद बलाई, भुसार व्यापारी.
शेतकरी प्रतिक्रिया
मागील खरीप हंगामात अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा विमा अद्याप मिळाला नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने धान्य खरेदीही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा कसा येईल, याची काळजी आहे.
- प्रवीण जाधव, शेतकरी, उमरा.
बाजार समिती परिसरातील व्यवहार थंडावल्याने ज्वारी, हरभरा अजून घरातच आहेत. व्यवहार कधी सुरू होणार, धान्याचे भाव वाढणार की कमी होणार, याबद्दल काहीच सांगता येत नसल्याने पुढील काळात शेतकऱ्यांसमोर नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. जूनमध्ये पाऊस समाधाकारक झाला तर पेरणी करावीच लागेल. त्याच्या खर्चाची तरतूद कशी करायची, असा सवालही घोगरे यांनी उपस्थित केला.
- अमोल घोगरे, शेतकरी, एकुरका.
आठ दिवस व्यवहार बंद
बाजार समिती परिसरातील काही व्यापारी कोविड पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे समिती परिसरातील व्यवहार आठ दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग बाजार समिती परिसरात धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.