शहरासह ग्रामीण भागातही कोरोना ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:00+5:302021-06-11T04:23:00+5:30

मुरूम : शहर व परिसरात बुधवारी व गुरुवारी दोन दिवसात ४७५ कोरोना संशयित व संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करण्यात ...

Corona swelled in urban as well as rural areas | शहरासह ग्रामीण भागातही कोरोना ओसरला

शहरासह ग्रामीण भागातही कोरोना ओसरला

googlenewsNext

मुरूम : शहर व परिसरात बुधवारी व गुरुवारी दोन दिवसात ४७५ कोरोना संशयित व संपर्कातील लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ग्रामीण भागात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले तर शहरात एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ४७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरासह ग्रामीण भागालाही दिलासा मिळाला आहे.

मागील दोन महिन्यांपासून शहर व परिसरात कोरोनाने थैमान घातले होते. कोरोना दिवसागणिक ओसरत असल्याने चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी कोरोना संशयित व संपर्कातील सहा तर गुरुवारी सात जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरासह ग्रामीण भागालाही दिलासा मिळाला आहे. उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्यकेंद्राअंर्तगत बुधवारी २३२ जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. यामध्येही केवळ तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. यापाठोपाठ गुरुवारी २४३ जणांच्या चाचणीत केवळ एकालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन दिवसात ग्रामीण भागात चारच रुग्ण आढळले तर शहरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता लॉकडाऊनचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

मुरुम शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास असून, शहरात आठ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात आतापर्यंत २५१ रुग्ण आढळून आले असून, २३० जणांनी उपचारानंतर कोरोनाला हरवून यशस्वीपणे घरी परतले आहेत. या आजाराने आतापर्यंत शहरातील बारा जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उमरगा व लोहारा तालुक्यातील केवळ ११ जणांवर उपचार सुरू असून, गुरुवारी उपचारानंतर बरे झालेल्या तीन जणांनी घरी सोडण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सध्या एकाच गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात सध्या ९ रुग्ण उपचाराखाली असून यात कोविड सेंटरमध्ये ६ तर उमरगा येथे २ आणि ग्रामीण रुग्णालयात एकावर उपचार सुरू आहेत. शहरातील ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत चार हजार ५०० जणांनी लसीकरण करून घेतले आहे.

चौकट......

आलूरमध्ये १५३ जणांनी कोरोनावर केली मात

आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणाऱ्या गावात आतापर्यंत १६७ कोरोना रुग्ण आढळून आले होते. यात १२ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर सध्या २ रुग्ण उपचाराखाली आहेत. उपचारानंतर बरे झालेल्या १५३ जणांनी आतापर्यंत कोरोनाला हरवले आहे. आलूर प्राथमिक आरोग्यकेंद्राअंर्तगत येणाऱ्या गावात दोन हजार १०० जणांनी लस टोचून घेतली आहे. या केंद्राअंतर्गत येणाऱ्या केसरजवळगा, बेळंब, कदेर या उपकेंद्राअंतर्गत टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. नागरिकांंत झालेली जनजागृती, लॉकडाऊन, लसीकरण या कारणांमुळे शहरासह ग्रामीण भागातही कोरोना ओसरत असल्याचे मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजित डुकरे आणि आलूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश बेंबळगे यांनी दिली.

Web Title: Corona swelled in urban as well as rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.