कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:22 AM2021-07-11T04:22:59+5:302021-07-11T04:22:59+5:30

कळंब : कोरोनामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असतानाच खऱ्या अर्थाने अनेकांच्या प्रपंचाचे अर्थकारणही ‘लॉकडाऊन’ झाले होते. यामुळे खिशात खुळखुळणाऱ्या ...

Corona taught costcutting | कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग

कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग

googlenewsNext

कळंब : कोरोनामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असतानाच खऱ्या अर्थाने अनेकांच्या प्रपंचाचे अर्थकारणही ‘लॉकडाऊन’ झाले होते. यामुळे खिशात खुळखुळणाऱ्या पैशाची आवक मंदावल्याने अनेकांनी आपल्या खर्चात कपात करण्याचा मार्ग निवडत ‘कॉस्टकटिंग’ सुरू केल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या आगमनाने गतवर्षी मार्चला लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा गंभीर परिणाम जसा उद्योग, व्यवसायावर झाला तसाच तो अनेकांच्या रोजीरोटीवरही झाला. अनेकांचा रोजगार गेला, व्यवसाय कर्जात डुबले गेले. काहींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना गाव गाठावे लागले तर हातावर पोट असणाऱ्यांना घरातच अडकावे लागले. एकूणच पुढं ‘अनलॉक’चे पर्व सुरू झाले तरी कोरोनाची धास्ती कायम असल्याने घसरलेली गाडी अद्याप रूळावर आली नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम वैयक्तिक लाईफस्टाईल व कुटुंबाच्या खर्चावरही झाल्याचे स्पष्ट झाले असून, उत्पन्नाचे स्रोत कमकुवत झाल्याने अनेकांच्या कुटुंबात ‘कॉस्टकटिंग’चा अवलंब होत असल्याचे दिसून येत आहे. यातही यासाठी त्या-त्या कुटुंबातील ‘गृहिणी’ पुढाकार घेत असून, अनावश्यक खर्चाला टाळत केवळ गरजेच्या गोष्टीवर खर्च करण्यावर भर दिला जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

पॉईंटर्स

कुठे कुठे केली कॉस्टकटिंग

१. उत्पन्नाचा झरा बंद झालेल्या अनेक कुटुंबानी केवळ खाद्यान्न अन् तत्सम बाबींच्या खर्चावर लक्ष देत इतर खर्चाला जवळपास वर्षभर ‘होल्ड’ ठेवले.

२. गतवर्षात कपडालत्ता, रंगरंगोटी, गृहसजावटीच्या वस्तू, दागिने, वाहने, घरात लागणाऱ्या इतर वस्तू अशा अनेक वस्तूंच्या खरेदीचा मुहूर्त जवळपास टाळलाच.

३. आरोग्य, स्वयंपाक घरातील खर्चाला प्राधान्य दिले असले तरी हॉटेलिंग, लग्न व इतर धार्मिक सोहळ्यासाठी होणाऱ्या अवाढव्य खर्चाला बगल देण्यात आली. मानपानाच्या गोष्टीदेखील जेमतेमच दिसून आल्या. प्रवासाचा बेत जवळपास रद्दच झाले. यात्रा, तीर्थयात्रा घडल्या नाहीत. आत्पस्वकीयांच्या गावाचे दौरे काढले नाहीत. यातही मोठी कॉस्टकटिंग झाली.

प्रतिक्रिया

कामावरील मावशी कमी केल्या....

लॉकडाऊन काळात सर्वांचे व्यवसाय बंद होते. यामुळे उत्पन्नाच्या सोर्सवर परिणाम झाला. यानंतर आम्ही घरातील किराणा, भाजीपाला आदी दैनंदिन खर्चावर थोड्या मर्यादा आणल्या. आवश्यक त्या गोष्टीवरच खर्च केला जावू लागला. बाहेरची हॉटेलिंग किंवा खाद्यपदार्थाचा खर्च जवळपास बंदच झाला. घरात धुणी, भांडी करण्यासाठी लावलेल्या मावशींना कमी केले. एकूणच येणारा काळ कसा असेल याची माहिती नसल्याने प्रत्येक गोष्टीत काटकसर करण्याचा मार्ग अवलंबला.

- सुचिता श्रीकांत शेगदार, कळंब

सोने, कपडे खरेदी अन् देवकार्य टाळले...

आम्ही जोडव्यवसाय म्हणून गणेशमूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतो. ज्या उन्हाळ्यात या मूर्ती बनवल्या जातात, त्याच काळात लॉकडाऊन झाल्याने मोठे नुकसान झाले. पुढं याचा अर्थकारणावर परिणाम झाला. यामुळे आम्ही घरातील खर्चावर मर्यादा आणत या संकटावर मात केली. दिवस कठीण गेले. यामुळे कपडे, इतर साहित्य, किराणा यांच्या खर्चावर मर्यादा आणल्या. सोने, कपडे खरेदी टाळली. देवकार्य व खर्चिक कार्यक्रम टाळले. केवळ दवाखाना अन् किराणा यालाच महत्त्व देत आलेला दिवस काढले.

- रोहिणी योगराज पांचाळ, दहिफळ, ता. कळंब

Web Title: Corona taught costcutting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.