corona virus : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी घेतले ४ हजार, पालिका कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 05:13 PM2021-04-24T17:13:15+5:302021-04-24T17:15:15+5:30
corona virus : उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता.
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाबाधित रुग्णाच्या अंत्यविधीसाठी नगरपालिका सफाई कामगारांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून ४ हजार रुपये घेतल्याचा प्रकार शुक्रवारी तुळजापुरात उघडकीस आला. या प्रकाराची तातडीने चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले.
उस्मानाबाद तालुक्यातील बामणी येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला होता. नगरपालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांचा विनामूल्य अंत्यविधी करण्यात येतो. मात्र, तुळजापूर येथे बामणी येथील त्या मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडे अंत्यविधी करण्यासाठी नगरपालिका सफाई कामगार शंकर राजेंद्र कांबळे याने ४ हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारली होती. याचवेळी नातेवाईकांनी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा मुख्याधिकारी लोकरे यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठून संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा सफाई कामगार शंकर कांबळे याने ४ हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मुख्याधिकारी लोकरे यांनी ही रक्कम त्या नातेवाईकाला परत करून सफाई कामगारावर निलंबनाची कारवाई केली.
रक्कम नातेवाईकांना परत
शुक्रवारी कर्मचाऱ्याने अंत्यविधीसाठी पैसे घेतल्याचा फोन आल्यानंतर स्वतः उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कर्मचारी आणि नातेवाईक यांना समोरा-समोर घेऊन चौकशी केली. तेव्हा कर्मचाऱ्याने चार हजार रुपये घेतल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम त्या नातेवाईकांना परत करून कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.
-आशिष लोकरे, मुख्याधिकारी, तुळजापूर