Corona Virus : उस्मानाबादच्या कारागृहात कोरोनाचा उद्रेक; २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:29 PM2021-05-17T19:29:04+5:302021-05-17T19:30:43+5:30
Corona Virus: सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील २७२ कैद्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते.
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. वर्षभरापासून कोरोना संसर्गास रोखलेल्या कारागृहात कोराेना विषाणूने प्रवेश केला असून, दोन दिवसांत तब्बल २७२ कैद्यांपैकी १२९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहाची क्षमता २६९ इतकी आहे. सध्या विविध गुन्ह्यांतील २७२ कैदी आहेत. मागील वर्षभरात कारागृहात एकही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आला नव्हता. मात्र, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य प्रशासनाने शुक्रवारी कारागृहातील २७२ कैद्यांचे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. शुक्रवारी तपासणीत ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ८४ जणांना बाधा झाल्याचे समोर आले, तर रविवारी १४ रुग्णांचा अहवाल अहवाल आला. अशा एकूण २७२ कैद्यांपैकी १२९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून कारागृहातच औषधोपचार सुरू केले आहेत. उर्वरित कैद्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी पाच दिवसांनंतर त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉक्टर म्हणाले. दरम्यान, याबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
रुग्णांना कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले
जिल्हा रुग्णालयातील २७२ कैद्यांची शुक्रवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी १२९ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना कारागृहातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी सहा डॉक्टर, कर्मचाऱ्यांची टीम तयार केली आहे. निगेटिव्ह आलेल्या रुग्णांची पाच दिवसांनंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे.
- डाॅ. सचिन बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय