Corona Virus : लोहारा तालुक्यातील २१ गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:49 PM2021-06-03T16:49:15+5:302021-06-03T16:50:48+5:30
Corona Virus: तालुक्यात आतापर्यत तीन हजारच्या पुढे रग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील २१ गावात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी १२ जूनपर्यत या २१ गावात जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
लोहारा शहरासह तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यत तीन हजारच्या पुढे रग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० वर आजही अँक्टिव्ह आहेत.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी काही प्रमाणात रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. पण पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी तालुक्यातील २१ गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार २ ते १२ जून रोजी सकाळी ७ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकूम आदेश लागू केला आहे. या आदेशाप्रमाणे २१ गावातील सर्व दुकाने पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील. तथापि रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न मेडिकल चालू राहतील. तसेच या गावातील नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदरील अत्यावश्यक सेवा पुरवताना सोशल डिस्टनसिंग व आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
या २१ गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू :
कानेगाव,नागुर,लोहारा खुर्द,जेवळी, एकोंडी लो, धानुरी, हिप्परगा (रवा), सास्तुर,खेड, आष्टाकासार, मार्डी, कास्ती बु. ,अचलेर, भातागळी,मोघा बु, सालेगाव, कोंडजीगड, नागराळ, तावशीगड, वडगाव (गां), जेवळी दक्षिण हे गावे आहेत.