Corona Virus : मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटाला गाडेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 07:56 PM2021-05-15T19:56:28+5:302021-05-15T19:58:49+5:30
Corona Virus : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे.
कळंब (जि.उस्मानाबाद) : राज्य सध्या आरोग्यविषयक संकटात आहे. अशाप्रसंगी याचे राजकारण कोणीही करू नये. उस्मानाबाद जिल्ह्यातील ऑक्सिजन प्रकल्पाच्या उभारणीत राज्यातील चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले आहे. हेही नसे थोडके. अडचणीच्या काळात मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्र एकत्र येतो व संकटाला गाडतो, असे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथील व्हर्च्युअल सोहळ्यात काढले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने देशातील पहिलाच ऑक्सिजन प्रकल्प अवघ्या १७ दिवसांत उभारला आहे. या प्रकल्पातून ऑक्सिजनची निर्मिती सुरू झाली असून, हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी उपयुक्त असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाचे व्हर्च्युअली उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे रक्तातील साखर वाढत आहे. अशावेळी साखर कारखानेच मदतीला पुढे येत आहेत, हा योगायोगच. धाराशिव कारखान्याने उभारलेला प्रकल्प हा ऑक्सिजनचा नव्हे तर जीव वाचविण्याचा आहे. राज्यात चाचण्या व बेडची संख्या वाढवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. चाचणीसंदर्भात अधिक सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या संकटावर महाराष्ट्र मात करेल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी अजित पवार, राजेश टोपे, जयंत पाटील, शंकरराव गडाख यांनीही मनोगते व्यक्त करून कारखाना व्यवस्थापनाचे कौतुक केले.
प्रत्येक जिल्ह्यात हवेत प्रकल्प : गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिक्विड ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भातील अडचणी मांडत भविष्यातील संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणारे असे प्रकल्प उभारावे लागतील, असे सुचविले. तसेच देशातील २० टक्के साखर इथेनॉलमध्ये उपयोगात आणल्यास ६० लाख टन साठा वापरात येईल. यामुळे गोडाउनमध्ये बसून असलेल्या साखरेवरील व्याजाचा भुर्दंड कमी होईल. याकडेही कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.