Corona Virus: नाती तुटली पण माणुसकी जिवंत; वृध्देवर महिला तहसीलदार, बिडीओनी केला मध्यरात्री अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 12:43 PM2021-05-13T12:43:24+5:302021-05-13T12:46:18+5:30
Corona Virus in Osmanabad : कर्ती माणसं दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना.
- चेतन धनुरे
उस्मानाबाद : कोरोनाने माणूस माणसात ठेवला नाही. नाती, शेजारधर्माची कुंडले केव्हाचीच गळून पडलीत. आता उरलीय ती केवळ माणुसकी. याच माणुसकीचा प्रत्यय भूमच्या महिला तहसीलदार अन बिडीओनी आणून दिला. देवळाली येथील एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला कोणीच पुढे येत नव्हते तेव्हा या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री स्वतः मातीत उतरून तिचा अंतिम प्रवास सुकर केला.
देवळाली येथील एका कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित निघाले. घरातील दोन कर्ते पुरुष अन ७५ वर्षीय आजीबाईना त्रास सुरू झाला. तेव्हा भूमला तपासणी करून बार्शी येथे उपचार घेऊ असे सांगत त्यांनी भूम सोडले. आजीबाईंनी मात्र, घरीच राहण्याचा हट्ट धरला. तेव्हा ते दोघे बार्शीच्या रुग्णालयात दाखल झाले. इकडे आजींनी आजार अंगावर काढत बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. घरात एक महिला अन दोन लहान मुलं होती. कर्ती माणसं दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना. हा प्रकार रात्री १० वाजता तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या कानी पडला. दीड तास प्रयत्न करूनही प्रश्न सुटत नव्हता. तेव्हा त्या स्वतः, बीडीओ भागवत धवलशंख यांनी ग्रामसेवक व अन्य एका सहकाऱ्यास सोबत घेऊन देवळाली गाठली. अंगावर पीपीई किट परिधान करून हे चौघेही मृतदेह घेऊन मध्यरात्री १२ वाजता स्मशानात गेले अन त्यांनीच या आजींचा अंत्यविधीही केला. एकीकडे या आजारामुळे सगळीच नाती मृतप्राय होत असताना माणुसकी अजूनही जिवंत आहे, हेच या घटनेतून प्रकर्षाने समोर आले.
हे तर आमचे कर्तव्य...
मयत आजींच्या घरातही कोणी पुरुष कर्ती माणसं नव्हती. ही घटना कळल्यानंतर अंत्यविधी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा फोन लागत नसल्याने रात्रीच बीडीओ धवलशंख यांच्या सोबतीने त्यांचे घर गाठले. तेव्हा तिथेही कुटुंबात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपणच अंत्यविधी करायचा असे ठरवून आम्ही देवळाली गाठली. मध्यरात्री अंत्यसंस्कार केले. माणुसकीच्या नात्याने आम्ही हे आमचे कर्तव्यच समजून ते पार पाडले.
-उषाकिरण शृंगारे, तहसीलदार, भूम (जि. उस्मानाबाद)