corona virus : तुळजाभवानी देवीचे दर्शन मंगळवारपासून बंद ! चैत्री पौर्णिमा यात्राही केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:30 PM2020-03-16T14:30:20+5:302020-03-16T14:55:58+5:30

सुट्टी जाहीर केल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली.

corona virus: Visitation of the goddess of Tulja Bhavani closes from today! Chaitri Purnima yatra was also canceled | corona virus : तुळजाभवानी देवीचे दर्शन मंगळवारपासून बंद ! चैत्री पौर्णिमा यात्राही केली रद्द

corona virus : तुळजाभवानी देवीचे दर्शन मंगळवारपासून बंद ! चैत्री पौर्णिमा यात्राही केली रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे बेमुदत कालावधीसाठी दर्शन बंद करण्याचा निर्णय या कालावधीत फक्त दैनंदिन धार्मिक विधी करण्यात येतील.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर १७ मार्च रोजीपासून भाविकांना दर्शनासाठी बेमुदत काळासाठी बंद करण्यात येत आहे. शिवाय, काही दिवसांवर येऊन ठेपलेली चैत्री पौर्णिमा यात्राही रद्द केल्याची माहिती व्यवस्थापक तथा तहसीलदार योगिता कोल्हे व विश्वस्त नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सोमवारी पुजारी मंडळाच्या बैठकीत दिली.

राज्य शासनाने दिनांक १६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीसाठी राज्यातील सर्व महाविद्यालय, शाळा यांना सुट्टी जाहीर केल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी ही बाब लक्षात येताच दक्षता म्हणून मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी १६ मार्च रोजी बोलविलेल्या तातडीच्या बैठकीत भाविकासाठी बेमुदत कालावधीसाठी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत फक्त दैनंदिन धार्मिक विधी करण्यात येतील. यासाठी संबंधित धार्मिक विधीतील व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. शिवाय, सिंहासन पूजाही रद्द करण्यात आली असून, फक्त दोन वेळचा अभिषेक भक्तांच्या वतीने मंदिर संस्थान करेल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. इतर वेळी या मंदिरात पोलीस कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी राहतील.

शहरातील इतर पुजाऱ्यांनाही प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच व्हीआयपी व इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही दर्शन बंद करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील उपदेवता यांच्या पूजेसाठी फक्त संबंधीत पुजाऱ्यांना प्रवेश दिला जाईल. इतर कोणत्याही व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. यातून महंत, पाळीचे पुजारी व उपदेवता यांचे पुजारी तसेच सेवेकरी यांना वगळून इतरांना प्रवेश बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करून देवी दर्शनाला येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी विश्वस्त तहसीलदार सौदागर तांदळे, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंंतुले, महंत तुकोजीबुवा, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर, पुजारी मंडळाचे पदाधिकारी नागेश साळुंखे, उपाध्य मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, नागेश शितोळे यांच्यासह पुजारी मंडळाचे पदाधिकारी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते.

 बुकिंगचे पैसे करणार परत...
 ज्या देवी भाविकांनी सिंहासन पूजा बुकिंग केली आहे, त्या सर्व पुजा रद्द करण्यात आल्या आहेत. संबंधित भाविकांचे पैसे त्यांना परत करण्यात येणार असल्याचेही विश्वस्तांनी सांगितले. शिवाय, पुढील बुकिंगही रद्द करण्यात आली आहे.
 

Web Title: corona virus: Visitation of the goddess of Tulja Bhavani closes from today! Chaitri Purnima yatra was also canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.