coronavirus : उस्मानाबादेत आणखी ११ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 11:50 PM2020-07-02T23:50:01+5:302020-07-02T23:50:48+5:30
जिल्हयात बाधितांची संख्या २४६ एवढी झाली आहे.
उस्मानाबाद - जिल्ह्यातील विविध रुग्णालयाकडून गुरुवारी १४१ नमुने तपासणीसाठी पाठविले असता कोरोनाग्रस्तांच्या संख्येत नवीन ११ जणांची भर पडली. त्यामुळे जिल्हयात बाधितांची संख्या २४६ एवढी झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयाकडून गुरुवारी १४१ नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. रात्री साडेदहा वाजता सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असता ११ पॉझिटिव्ह, अनिर्णित ०७ तर १२३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. यात
उमरगा तालुक्यातील ७, तुळजापूर २, भूम ०१ तर परांडा तालुक्यातील एका बाधितांचा समावेश आहे.
दरम्यान, परांडा तालुक्यातील नालगाव, भूम शहरातील लक्ष्मीनगर, तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा व तुळजापूर शहरात आढळून आलेले प्रत्येकी एक रुग्ण यापूर्वीच्या बाधितांचा संपर्कातील आहेत. त्याचप्रमाणे उमरगा तालुक्यातील सात पैकी एक कसगी, दुसरा गुगळगाव तर उर्वरित पाच पेशंट हे उमरगा शहरातील आहेत. सात पैकी सहाजण उमरग्यातील प्रायव्हेट रुग्णालयातील कर्मचारी आहेत. नवीन ११ बाधितांमुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या २४६ झाली आहे. यापैकी १७८ जणांना सुटी देण्यात आली. तर ५६ जणांवर उपचार सुरू आहेत.