coronavirus : उस्मानाबादेत पुन्हा ६ नवे कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:22 AM2020-05-20T01:22:03+5:302020-05-20T01:22:03+5:30
सर्वजण मुंबईहून परतलेले असल्याची माहिती
उस्मानाबाद : जिल्ह्यात आज नव्याने 6 कोरोना बाधितांची भर पडली आहे. एकीकडे आज एका रुग्णाची सुटी होत असतानाच मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील बाधितामध्ये नवी भर पडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज घडीला 7 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयातून 49 नमुने लातूरला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 48 नमुन्यांचे अहवाल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास प्राप्त झाले आहेत. त्यात 6 जण पॉझिटिव्ह तर 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये तुळजापूरच्या रुग्णालयातील, उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील व भूम येथील रुग्णालयातील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर 3 रुग्ण हे परंडा रुग्णालयातील आहेत. जवळपास हे सर्वजण मुंबईहून परतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी सांगितले. सध्या या बाधितांचा संपूर्ण प्रवास इतिहास व संपर्कातील व्यक्तींची माहिती काढली जात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, भूम तालुक्यात आढळून आलेला एक रुग्ण गिरवली या माजी आमदारांच्या गावातील आहेत.