coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात नवीन ६ बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:26 AM2020-05-22T00:26:12+5:302020-05-22T00:27:38+5:30
सर्व बाधित मुंबईवरून आलेले
उस्मानाबाद : जिल्ह्यात पुन्हा नव्याने 6 कोरोना बाधितांचा प्रवेश झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री प्रलंबित अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले. त्यातुन ही माहिती समोर आली आहे. हे सर्वजण नुकतेच मुंबईहून परतल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी 17 बाधित रुग्णांची नोंद आहे. यातील 4 जण कोरोनामुक्त झाले असून, 13 जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी रात्री लातरहून प्रलंबित नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यानुसार वाशी तालुक्यातील पिंपळगाव लि. व परंडा तालुक्यातील खंडेश्वरीवाडी येथील प्रत्येकी एक तर लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 4 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राज गलांडे यांनी दिली.
हे सर्वच बाधित नुकतेच मुंबईहून गावी परतले होते. शिवाय, ते यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील होते, अशीही माहिती डॉ गलांडे यांनी दिली. ही माहिती कळताच प्रशासन आता संबधित गावांमध्ये पुढील उपाययोजना आखण्याची तयारी करीत आहे.