Coronavirus : उस्मानाबादच्या प्रयोगशाळेस ‘एम्स’ची मान्यता; दोन दिवसांत सुरु होणार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:46 PM2020-07-21T20:46:05+5:302020-07-21T20:47:59+5:30
उस्मानाबाद जिल्ह्याचे स्वॅब नमुने पहिल्यांदा पुण्याला पाठविण्यात येत होते़ त्यानंतर सोलापूर, लातूर असा प्रवास करीत आता सध्या अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत तपासण्यात केल्या जात आहेत़
उस्मानाबाद : कोरोना चाचण्यांसाठी विद्यापीठ व लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद येथील प्रयोगशाळेस मंगळवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता दिली आहे़ त्यामुळे चाचण्यांसाठी उस्मानाबाद जिल्ह्याची होत असलेली फरफट आता येत्या दोन दिवसांत संपुष्टात येणार आहे़
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचे स्वॅब नमुने पहिल्यांदा पुण्याला पाठविण्यात येत होते़ त्यानंतर सोलापूर, लातूर असा प्रवास करीत आता सध्या अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत तपासण्यात केल्या जात आहेत़ दरम्यान, उपरोक्त जिल्ह्यांत कोरोना चाचण्या वाढल्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या चाचण्यांना विलंब होत होता़ परिणामी, स्वॅब नुमने घेण्यावर मर्यादा आल्या़ यातून संसर्ग वाढीस लागला आहे़ मात्र, मंगळवारी ‘एम्स’ने उस्मानाबाद येथील डॉ़बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेस मान्यता दिली आहे़ त्यामुळे येत्या दोन दिवसांत याचठिकाणी तपासण्यांना सुरुवात होऊ शकेल़ या प्रयोगशळेची क्षमता ८ तासांच्या एका शिफ्टमध्ये २०० स्वॅब नमुने तपासण्याची आहे़ गरजेनुसार शिफ्ट वाढवून दिवसात ६०० तपासण्या करता येणार आहेत़
दरम्यान, ही प्रयोगशाळा विद्यापीठ आणि लोकसभागातून उभारण्यात आली आहे़ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी विविध कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी, स्थानिक जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशन, साखर कारखाने, बँक व दानशूर व्यक्तींना आवाहन करुन निधी जमवला़ शिवाय, सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनीही विद्यापीठाच्या माध्यमातून उपकेंद्रातील जैवतंत्रज्ञान विभागाची इमारत व आतील सुविधांसाठी २० लाख रुपये मंजूर करुन घेतले़ एकूण १ कोटी २० लाख रुपये खर्चातून ही प्रयोगशाळा उभी करण्यात आली आहे़शासनाचा निधी न वापरता तयार झालेली ही बहुधा राज्यातील पहिलीच प्रयोगशाळा आहे़ विशेष म्हणजे, उपकेंद्रातील प्राध्यापक व पदव्युत्तरचे विद्यार्थी तपासण्यांसाठी योगदान देणार आहेत़ या प्रयोगशळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनानंतर कोणत्याही साथरोगाच्या विषाणंूची चाचणी येथे भविष्यात करता येणार आहे़ शिवाय, येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ती कायमची उपयुक्त ठरणार आहे़
अशी मिळाली मान्यता...
आवश्यक उपकरणे व सुविधा पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्रातील प्रयोगशाळेकडे लातूरहून यापूर्वीच तपासलेले दोन सॅम्पल स्वॅब पाठविण्यात आले होते़ याठिकाणी या दोन्ही स्वॅबची तपासणी करुन त्याचे अहवाल ‘एम्स’कडे पाठविण्यात आले़ तेथे लातूरच्या प्रयोगशाळेकडून याच सॅम्पलचे आलेले अहवाल व उस्मानाबादचे अहवाल यांची पडताळणी करण्यात आली़ दोन्हीकडचे अहवाल एकच असल्याची खात्री करण्यात आली़ या कसोटीत उस्मानाबादची प्रयोगशाळा उत्तीर्ण झाल्याने त्यास मान्यता देण्यात आली आहे़