Coronavirus: राज्यातील सर्वात मोठी यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 17:37 IST2020-03-11T17:29:36+5:302020-03-11T17:37:19+5:30
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा (ता. कळंब) येथील देवी येडेश्वरीच्या चैत्र पौणिर्मा यात्रेस 8 एप्रिलपासून सुरवात होणार आहे.

Coronavirus: राज्यातील सर्वात मोठी यात्रा रद्द
उस्मानाबाद : कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून प्रशासनाकडून औरंगाबादमधील पैठणमध्ये होणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आले होते. त्यांनतर आता राज्यातील सर्वात मोठी समजली जाणारी उस्मानाबाद जिल्ह्यातील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश दिले आहे.
तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित असलेल्या येरमाळा (ता. कळंब) येथील देवी येडेश्वरीच्या चैत्र पौणिर्मा यात्रेस 8 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. दरवर्षी येडेश्वरीची यात्रा पाच दिवस असते. यात्रेनिमित्त चैत्र पौणिर्मेदिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा होवून रात्री छबीना मिरवणूक पार पडत असते. मात्र कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून यावेळी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, यासंबंधी गावकरी आणि प्रशासनाची आज बैठक पार पडली आहे.
या यात्रेला जवळपास 10 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने व कोरोना व्हायरसची साथ पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. बुधवारी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मंदिर ट्रस्ट आणि गावकऱ्यांची या संबधी बैठक घेतली असून, एक मतानी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिर येथून निघणारा पालखी सोहळा व चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आला आहे.
विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात आज प्रशासकीय अधिकारी, मंदिर ट्रस्ट आणि गावकऱ्यांची बैठक झाली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गावकऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेशाचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले व योग्य त्या सूचना देण्यात आल्या. तर गावकऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत एक मतानी ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. ( पंडित सोनवणे - सहायक पोलीस निरीक्षक )