Coronavirus: गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणं महागात पडले; दोघा महंतांसह सातजणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:44 PM2020-04-12T17:44:11+5:302020-04-12T17:44:33+5:30
तुळजापूरात जमावबंदी आदेशाचे केले उल्लंघन, कार्यक्रमाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने प्रकार उजेडात
उस्मानाबाद : वाढदिवस साजरा करून फेसबुकवर व्हीडिओ अपलोड करणे श्री तुळजाभवानी देवीच्या दोन महंतांसह अन्य पाच व्यक्तींच्या चांगलेच अंगलट आले आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या फिर्यादीवरून १२ एप्रिल रोजी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनीही जमावबंदी आदेश लागू केला आहे. हे माहित असतानाही तुळजापूर येथील महंत तुकोजी बुवा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ढेकरी परिसरातील शेतात विशाल रोचकरी, संजय पवार व इतर पाचजणांना एकत्र केले. तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वा तत्सम साहित्य न बांधता तसेच सोशल डिस्टन्सिंग न राखता वाढदिवसाचा केक कापला. या कार्यक्रमाची जवळपास ११ सेकंदाची व्हीडिओ क्लिप तयार करून सूरज जगताप या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवर अपलोड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तुळजापूर ठाण्यातील गोपनीय शाखेचे पोना अमोल कलशेट्टी, रवी भागवत यांनी सदरील प्रकरणाची माहिती घेतली असता, त्यांची खात्री पटली. यानंतर फेसबुकवरून संबंधित व्हीडिओ क्लिप डाऊनलोड करून ती तपासली असता, सदरील कृत्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करणारे असल्याच्या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे यांच्या फिर्यादिवरून महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, विशाल रोचकरी, संजय पवार यांच्यासह इतर तीन लोकांविरुद्ध कलम १८८, २६९ महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम-२०२० कलम ११ अन्वये १२ एप्रिल रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.