coronavirus : उस्मानाबादेत 20 डॉक्टर बाधित, दत्ता भोसले ठणठणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 10:50 AM2020-08-02T10:50:52+5:302020-08-02T10:57:08+5:30
शहरातील तज्ज्ञ डॉ दत्ता भोसले हेही बाधित झाले असून, त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
उस्मानाबाद : शहरातील आरोग्य यंत्रणाच सध्या सलाईनवर आहे़ शासकीय व खाजगी असे एकूण २० डॉक्टरच बाधित निघाल्याने रुग्णांवरील उपचाराचा खोळंबा झाला आहे़ दरम्यान, शहरातील तज्ज्ञ डॉ दत्ता भोसले हेही बाधित झाले असून, त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मुळातच आरोग्याच्या सोयी-सुविधा अपुऱ्या आहेत़ त्यातच कोरोनाचा उद्रेक वाढल्याने आरोग्य यंत्रणेची घडी पुरती विस्कटली आहे़ येथील जिल्हा रुग्णालयात अशा कठीण काळातही १२५ विविध पदे रिक्त आहेत़ वर्ग १ ची १९ पदे असताना त्यातील केवळ ६ भरली गेली आहेत़ अजून १३ पदे रिक्तच आहेत़ भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या तरी रिक्त पदांमुळे उपचार करणार कोण? असा मोठा प्रश्न आहे़
गुरुवारी रात्रीपर्यंत उस्मानाबाद शहरातील खाजगी व जिल्हा रुग्णालयातील असे २० डॉक्टर्स व ३२ कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत़ त्यामुळे उपचाराच्या बाबतीत ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे़ मागील एकाच आठवड्यात ६५१ नवीन रुग्ण आढळले तर २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ अशा स्फोटक स्थितीसमोर आरोग्य यंत्रणाही हतबल होताना दिसून येत आहे़.