Coronavirus: शेतात राहून कोरोनावर मात, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रेरक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:11 AM2021-05-25T09:11:39+5:302021-05-25T09:11:46+5:30
Coronavirus In Maharashtra: दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत मन आनंदी ठेवत शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत एका सैनिकाच्या ६५ वर्षीय मातेने दहा दिवसात कोरोनाला हरवले.
कळंब (जि. उस्मानाबाद) : दररोज सकाळी योगासन, अनुलोम विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे, योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेत मन आनंदी ठेवत शेतात लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत एका सैनिकाच्या ६५ वर्षीय मातेने दहा दिवसात कोरोनाला हरवले. बालिका ज्ञानेश्वर यादव (रा. हासेगाव केज (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) त्या शेतकरी महिलेचे नाव आहे. बालिका यांना ताप, अंगदुखी, सर्दी व दम लागणे असा त्रास सुरू झाला. सैन्यदलात असलेले त्यांचे पुत्र रामहरी यादव यांनी आईची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. दवाखान्यात बेडसाठी धावपळ सुरू झाली. मात्र, कोठेही बेड मिळाला नाही. शेवटी रामहरी यादव यांनी आईला आधार देताना हा आजार छोटा आहे, डॉक्टरांनी औषधे दिली आहेत व शेतात राहायला सांगितले आहे, असे सांगितले. त्या माऊलीने दहा दिवस लिंबाच्या झाडाखाली काढले आणि आजाराला पळवले.
तब्येत उत्तम
सध्या आईची तब्येत चांगली आहे. ऑक्सिजन पातळीही ९६ पर्यंत आली आहे. सकारात्मक विचार ठेवले व योग्य औषधोपचार घेतला, तर नक्कीच घरी किंवा शेतात राहूनही कोरोनातून बरे होऊ शकतो, हे आईने दाखवून दिले, असे रामहारी यादव यांनी सांगितले.