धक्कादायक ! उस्मानाबादेत कोरोनाग्रस्त महाराज रुग्णालयातून पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:42 PM2020-08-15T13:42:14+5:302020-08-15T13:48:33+5:30
तासाभराच्या धावपळीनंतर पुन्हा रुग्णालयात आणण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश
उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका कोरोनाग्रस्त महाराजाने शनिवारी सकाळी रुग्णालयातून धूम ठोकली. जवळपास तासाभराने पत्ता लागल्यावर पोलीस, महसूल व आरोग्य प्रशासनाने अक्षरशः विनवण्या करून त्यास परत रुग्णालयात आणले.
उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एका महाराजावर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या महाराजाने यंत्रणेची नजर चुकवून पलायन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर या रुग्णाची शोधाशोध सुरू झाली. जवळपास तासाभराने हे महाराज नगरपालिकेच्या नाट्यगृहानजीक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, आरोग्य कर्मचारी ऍम्ब्युलन्ससह याठिकाणी पोहोचले. मात्र, महाराज काही केल्या त्यात बसेनात. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
गर्दी पाहून उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माली तेथे थांबले. त्यांनी घडल्या प्रकारची माहिती घेऊन मोठ्या प्रयत्नाने महाराजांना वाहनात बसविले. त्यांना घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्यानंतरही महाराजांचा ड्रामा सुरूच होता. येथे ते खाली उत्तरायलाच तयार नव्हते. पुन्हा विनवण्या करून त्यांना कोविड वार्डात पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे मात्र धिंडवडे निघाले.
महाराजांना हवेत सेवेकरी
कोरोनाग्रस्त महाराज जिल्हा रुग्णालयात त्यांची कोणीच सेवा करीत नसल्याची तक्रार मांडत होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सेवेकरी याठिकाणी सेवेसाठी बोलावून घ्या, असा लकडा लावला होता.
सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची
कोणालातरी फोन करायचा आहे असे सांगून संबधित पेशन्टने पलायन केले. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे, असे उत्तर या घटनेबाबत बोलताना प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी. के. पाटील यांनी दिले.