coronavirus : वडिलांच्या निधनानंतर काही तासांतच गुरुजी कोरोना कक्षात 'ऑन ड्युटी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 05:08 PM2020-03-29T17:08:07+5:302020-03-29T17:08:36+5:30
तालुका प्रशासनाने यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक कोरोना सहाय्यता कक्ष स्थापन केला आहे.
बालाजी अडसूळ
उस्मानाबाद - लॉकडाऊन काळात काही शासकीय कर्मचारी कोरोना आपत्तीमध्ये अतीशय गांभिर्याने कर्तव्य बजावत आहेत. याचा प्रत्यय उस्मानाबाद जिल्ह्यातील आथर्डी ता. कळंब येथे आला असून वडीलांची अंत्यविधी झाल्यानंतर अवघ्या काही तासात तेथील एक 'गुरूजी' कोरोना कक्षातील ड्यूटीवर 'हजर' झाले आहेत. त्यांच्या या कर्तव्यपरायणायतेची सर्वत्र चर्चा होत आहे. कोवीड १९ या विषाणूमळे जगभरात महामारीचे गंभिर चीत्र निर्माण झाले आहे. यास्थितीत कोरोनाचा अटकाव करण्यासाठी नेटाने प्रयत्न केले जात आहेत. सामाजीक अंतर ठेवण्यात सातत्य, नियोजन व नियंत्रण रहावे यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.
तालुका प्रशासनाने यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक कोरोना सहाय्यता कक्ष स्थापन केला आहे. याठिकाणी प्रत्येकी आठ तासाच्या तीन पाळ्यात कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.साधारणतः नऊशे लोकसंख्या असलेल्या तालुक्यातील आथर्डी गावात ही असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी तलाठी डि. व्ही. सिरसेवाड, सहशिक्षक आप्पासाहेब मुळे व सुर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. शिवाय आथर्डी येथील रहिवाशी सध्या भोगजी ता. कळंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या व भोगजी कोरोना कक्षात अतिरिक्त ठरलेल्या बाळासाहेब बाबासाहेब चौधरी या शिक्षकांसही आथर्डी येथील कोरोना कक्षात ड्यूटी लावण्यात आली आहे.
दरम्यान या कक्षात कार्यरत असलेल्या सहशिक्षक बाळासाहेब चौधरी यांचे वडील व आथर्डी गावचे ज्येष्ठ नागिरक बाबासाहेब दिंगबर चौधरी यांचे शुक्रवारी पहाटे वयाच्या ७५ व्या वर्षी वार्ध्यक्याने निधन झाले.यानंतर सकाळी दहाच्या आसपास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.चौधरी कुंटूबासाठी ही घटना दुःखदायक अशी होती. परंतु, वडीलांच्या निधनाचे हे दुःख बाजूला ठेवून सहशिक्षक बाळासाहेब चौधरी हे सायंकाळी चार वाजता आपल्या ठरल्या ड्यूटीत गावातील कोरोना कक्षात दाखल झाले.निर्धारीत पाळ्यात आपण न गेल्यामुळे कक्ष निर्मनूष्य राहिल याचा विचार करत चौधरी यांनी कठीण प्रसंगात आप्तस्वकीयांत न थांबता थेट आपल्या कर्तव्यावर जाणं पसंत केल असे तलाठी डि. व्ही. सिरसेवाड यांनी सांगितले.
सायंकाळपासून दुसर्या पाळीपर्यंत चौधरी गुरूजी तेथेच थांबले.सकाळी ही त्यांनी बराच काळ कक्षात काढला.आथर्डी गावात लोकसंख्येच्या दहा टक्के लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावाहून गावी परत आलेले आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेवून आपण घरातील दु:ख बाजूला ठेवत कर्तव्यावर हजर झालो असे सहशिक्षक बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले.असे असले तरी त्यांच्या या कर्तव्यपरायणायतेची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.