उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 06:46 PM2018-12-04T18:46:43+5:302018-12-04T18:48:17+5:30

मुख्याधिकारी येत नसल्याने पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे.

Corporators gandhigiti at umarga on absent ceo | उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार

उमरग्यात सतत गैरहजर असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला हार

googlenewsNext

उमरगा (उस्मानाबाद ) : येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने शहरातील विकास कामांवर परिणाम झाला आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवक, कार्यकर्त्यांनी आज दुपारी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करीत निषेध नोंदविला़

उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील मागील एक महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहेत़ त्यामुळे परंड्याचे मुख्याधिकारी दीपक इंगोले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे़ मात्र, परंडा शहर हे उमरगा शहरापासून जवळपास दीडशे किलोमीटर दूर आहे़ त्यामुळे इंगोले हे महिनाभरात एकदाच उमरगा पालिकेत आले आहेत़ काही महत्वाची कामे, कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची असल्यास उस्मानाबाद येथे कर्मचाऱ्यास बोलावून ते कामे करीत आहेत. मुख्याधिकारी येत नसल्याने पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे.

शहरातील विकासकामे, मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे़ विकास कामांचे नियोजन, मुलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी जबाबदार अधिकारी नसल्याने दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे़ मुख्याधिकारी पालिकेत येत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्या पाहता शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी मंगळवारी दुपारी कार्यकर्त्यांसमवेत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालय गाठले़ तेथे मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करीत निषेध व्यक्त केला़ यावेळी रत्नाकर सगर, युवा सेनेचे संदीप चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते़

शहरवासियांना वेठीस धरू नये
मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांना उमरगा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा भार संभाळण्यात स्वारस्य नसेल तर त्यांनी इतर ठिकाणी जावे़ विनाकारण शहरवासियांना वेठीस धरू नये़ पालिकेचा पदभार घेतल्यापासून ते सतत कोणत्या न कोणत्या कारणाने बाहेरच राहिले असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे म्हणाले़.

Web Title: Corporators gandhigiti at umarga on absent ceo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.