‘वॉटरकप’च्या बक्षीस रक्कमेत अपहार; सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:31 PM2018-05-22T18:31:48+5:302018-05-22T18:34:19+5:30
‘वॉटर कप’ स्पर्धेत मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील खेर्डा येथील सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द सोमवारी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उस्मानाबाद : ‘वॉटर कप’ स्पर्धेत मिळालेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील खेर्डा येथील सरपंचासह ग्रामसेवकाविरूध्द सोमवारी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दोघांनी या बक्षीस रक्कमेतील ८५ हजार रूपयांचा अपहार केल्याचे चौकशीत समोर आले आहे़
पंचायत समितीचे विस्ताराधिकारी तुकाराम जाधव यांनी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़तालुक्यातील खेर्डा गावाला वाटर कप स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसापोटी जानेवारी २०१८ मध्ये साडेसात लाखाचे बक्षीस मिळाले होते़ पाणी फाऊंडेशनच्या नियमाप्रमाणे ग्रामसभेची बैठक घेवून जलसंधारणाच्या कामावर खर्च करणे अपेक्षित होते़ ही रक्कम अध्यक्ष व सचिव पाणी फाऊंडेशन समिती खेर्डा यांच्या नावावर वर्ग करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ त्याप्रमाणे ही रक्कमही सरपंच, ग्रामसेवकांनी धनादेशाने कळंबच्या महाराष्ट्र बँकेतील पाणी फाऊंडेशन समितीकडे वर्ग केली होती.
समितीने हा धनादेश वटविण्यासाठी बँकेकडे पाठविला असता बँकेने अपर्याप्त असा शेरा मारून पाठविला़ त्यामुळे समितीने याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी पी़डीक़ाळे यांच्याकडे केली होती़ याची दखल घेवून काळे यांनी याबाबत चौकशी केली असता साडेसात लाख रूपये रक्कमेतून टप्प्या-टप्प्याने ८५ हजार ४० रूपयाची रक्कम ग्रामसभेचा कोणताही ठराव न घेता सरपंच सविता पोपट भंडारे, ग्रामसेवक शशिकांत गजेंद्र पवार यांनी संगनमत करून उचलल्याचे निदर्शनास आले़ ही रक्कम जलसंधारण कामावरही वापरण्यात आली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ तुकाराम जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच सविता भंडारे, ग्रामसेवक शशिकांत पवार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़