हायमास्टवर सव्वाकाेटींचा खर्च, सहा महिन्यांतच ‘गुणवत्ते’चे पितळ उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:06+5:302021-07-22T04:21:06+5:30

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील आराेग्य केंद्रही हायमास्टच्या उजेडात उजळून निघावीत, यासाठी प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्राच्या आवारात हायमास्ट दिवे बसविण्याचा ...

The cost of Savvakati on the highmast, the brass of ‘quality’ opened in six months | हायमास्टवर सव्वाकाेटींचा खर्च, सहा महिन्यांतच ‘गुणवत्ते’चे पितळ उघडे

हायमास्टवर सव्वाकाेटींचा खर्च, सहा महिन्यांतच ‘गुणवत्ते’चे पितळ उघडे

googlenewsNext

उस्मानाबाद : ग्रामीण भागातील आराेग्य केंद्रही हायमास्टच्या उजेडात उजळून निघावीत, यासाठी प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्राच्या आवारात हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषद आराेग्य समितीकडून घेण्यात आला हाेता. या निर्णयामागचा हेतू चांगला असला तरी ते काम दर्जेदार व्हावे, यासाठीही आराेग्य समितीचे प्रमुख तसेच प्रशासनाकडून प्रयत्न हाेणे गरजेचे हाेते. परंतु, आजघडीला अनेक आराेग्य केंद्रातील हायमास्टच्या दिव्याखाली अंधार (बल्ब बंद पडले) निर्माण झाल्याने गुणवत्तेकडे संबंधितांनी किती लक्ष दिले, हे समाेर येते. गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यामागचे इंगित काय? असा सवालही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गाेरगरीब रुग्णांसाठी जवळपास ४४ प्राथमिक आराेग्य केंद्र चालविली जातात. या केंद्रांच्या परिसरातच डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची निवासस्थानेही आहेत. आराेग्य केंद्र तसेच निवासस्थाने हायमास्टच्या प्रकाशात उजळून निघावीत, यासाठी आराेग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दाेन हायमास्ट दिवे बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषद आराेग्य समितीकडून घेण्यात आला हाेता. ज्याचे प्रमुखपद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्याकडे आहे. प्रत्येक केंद्रासाठी साधारणपणे तीन लाखांची तरतूद करण्यात आली. म्हणजेच, ४४ केंद्रांसाठी मिळून सव्वाकाेटींपेक्षा अधिक तरतूद करण्यात आली. या निधीतून मार्च २०२१पूर्वी आराेग्य केंद्रात प्रत्येकी दाेन याप्रमाणे ८८ हायमास्ट बसविण्यात आले. हे बिल मार्च महिन्यात संबंधित एजन्सीला वर्ग करण्यात आले. म्हणजेच, ही सर्व कार्यवाही हाेऊन अवघ्या पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लाेटला असतानाच हायमास्टच्या गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. ‘लाेकमत’ने आराेग्य केंद्रनिहाय आढावा घेतला असता, कुठे एका हायमास्टचे दाेन दिवे बंद आहेत. कुठे एक दिवा बंद आहे, तर कुठे एका खांबावरील सर्वच दिवे बंद पडल्याने अंधार निर्माण झाला आहे. बंद पडलेल्या दिव्यांचे प्रमाण काढले तर ते गुणवत्तेच्या गप्पा मारणारे लाेकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यामुळे प्रत्येक हायमास्टचे ऑडिट झाल्यास निविदेप्रमाणे कामे झाली का? निविदेत नमूद केलेल्या कंपनीच्या वा क्षमतेचे दिवे बसविले का? लाेखंडी खांबाचे निकषाप्रमाणे वजन आणि काॅलिटी आहे का? नसेल तर गुणवत्ता तपासणी करणाऱ्या यंत्रणेने काय केले? त्यांनी काेणाच्या इशाऱ्यावरून डाेळेझाक केली? हे समाेर येऊ शकते.

चाैकट..

...अशी आहे वस्तुस्थिती

वाशी तालुक्यातील पारगाव केंद्रातील एका हायमास्टचा पहिला आणि चौथा पाॅईंट (बल्ब) बंद आहे. पारा केंद्रातील तर दाेन्ही दिव्यांचे पहिला व चौथा पाॅईंट बंद पडले आहेत. तेरखेडा येथील एका दिव्याचा तिसरा व चौथा, तर दुसऱ्या दिव्याचा पहिला व चौथा पाॅईंट बंद आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढाेकी आराेग्य केंद्राचे दिवे बंद आहेत. भूम तालुक्यातील पाथरूड केंद्रातील हायमास्टचा पहिला व चौथा पाॅईंट बंद आहे. लाेहारा तालुक्यातील जेवळी येथील दाेन्ही खांबांवरील केवळ एकेकच दिवा सुरू आहे. उर्वरित बंद पडले आहेत. तुळजापूर तालुक्यातील सलगरा, जळकाेट, मंगरूळ केेेंद्रातील दिव्यांचा पहिला व दुसरा पाॅईंट बंद आहे. म्हणजेच येथील सर्वच दिवे बंद असल्यात जमा आहेत. उमरगा तालुक्यातील आलूर केंद्रातील दिवे बंद आहेत. त्यामुळे काेट्यवधींचा खर्च हाेऊनही रुग्णांसह डाॅक्टर्स, कर्मचाऱ्यांना गैरसाेयीला ताेंड द्यावे लागत आहे.

हायमास्टच का, साेलार का नकाे...

‘ओएनजीसी’च्या सीएसआर फंडातून आराेग्य विभागासाठी सुमारे २५ ते २७ लाख रुपये मंजूर झाले हाेते. आराेग्य केंद्रांना भेडसावणारा विजेचा प्रश्न लक्षात घेऊन साेलार दिवे बसविण्याचा निर्णय झाला हाेता. ही प्रक्रिया स्थानिक पातळीवर करण्याचा काहींचा हट्ट हाेता. परंतु, तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फड यांनी मेडाकडे निधी वर्ग केला. अवघ्या तीन लाखांत विजेसाेबतच पाणी तापविण्याची सुविधा उपलब्ध हाेणार आहे. एवढेच नाही तर दहा वर्षे देखभाल दुरूस्तीही मेडाकडेच आहे. साेबतच विद्युतबिलाची कटकट राहणार नाही. असे असतानाही जिल्हा परिषद पदाधिकारी हायमास्टवरच का भर देताहेत, हा संशाेधनाचा विषय मानला जात आहे.

सावंतांचे दुर्लक्ष झाले कसे?

स्वच्छ व पारदर्शक कारभार करणारे पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आराेग्य समितीचे सभापती धनंजय सावंत यांची ओळख आहे. यांच्याच विभागाअंतर्गत येणाऱ्या आराेग्य केंद्रात जवळपास सव्वाकाेटी रुपये खर्च करून हायमास्ट दिवे बसविण्यात आले. मात्र, पाच ते सहा महिन्यांतच बहुतांश आराेग्य केंद्रातील दिवे बंद पडल्याने गुणवत्तेचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे दिव्यांच्या गुणवत्तेकडे सावंतांचे दुर्लक्ष झाले कसे? यामागचे इंगित काय? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

काेट...

पाच ते सहा महिन्यांत दिवे बंद पडले असतील तर ही गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील किती आराेग्य केंद्रांचे हायमास्ट सुरू आहेत? किती बंद आहेत? याचा आढावा घेतला जाईल. साेबतच दिव्यांची गुणवत्ताही पुन्हा तपासण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले जातील. जे काेणी दाेषी आढळून येतील, त्यांच्याविरूद्ध कारवाई करू.

- धनंजय सावंत, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: The cost of Savvakati on the highmast, the brass of ‘quality’ opened in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.