उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेची उद्या मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 07:12 PM2018-06-11T19:12:14+5:302018-06-11T19:12:25+5:30
न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीचा मार्ग खंडपीठाच्या आदेशाने मोकळा झाला आहे़ याअनुषंगाने आता १२ जून रोजी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.
उस्मानाबाद : न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या मतमोजणीचा मार्ग खंडपीठाच्या आदेशाने मोकळा झाला आहे़ याअनुषंगाने आता १२ जून रोजी सकाळी ८ वाजता उस्मानाबाद येथे मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघात भाजपचे सुरेश धस व आघाडी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात अतिशय अटीतटीची लढत होत आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर बीड जिल्ह्यातील १० नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र ठरविले होते. यानंतर याच विषयाशी संबंधित तब्बल ५ याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एक फेटाळून लावत उर्वरीत चार याचिकांचा एकत्रच निकाल खंडपीठाने सोमवारी दिल्यानंतर मतमोजणीचा मार्ग खुला झाला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे यांनी निवडणूक आयोगाला मतमोजणीच्या कार्यक्रमासंदर्भात सूचना कळविण्याची विनंती केली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आयोगाचे निर्देश त्यांना प्राप्त झाले असून, त्यानुसार मंगळवारी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. उस्मानाबादच्या तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार असून, ११ वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राधाकृष्ण गमे म्हणाले, सायंकाळीच आयोागचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १२ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, आता मतमोजणीशी संबंधित यंत्रणांना याबाबत कळविण्याचे काम सुरु आहे.