पंधरा दिवसांत ७२० परसबागांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:22 AM2021-07-01T04:22:40+5:302021-07-01T04:22:40+5:30

(फोटो : सुशील शुक्ला २९) परंडा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व पोषण ...

Creation of 720 kitchen gardens in fortnight | पंधरा दिवसांत ७२० परसबागांची निर्मिती

पंधरा दिवसांत ७२० परसबागांची निर्मिती

googlenewsNext

(फोटो : सुशील शुक्ला २९)

परंडा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदअंतर्गत कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व पोषण यांचा दर्जा उंचावण्यासाठी ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ राबवण्यात येत आहे. याला तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेत २८ जूनपर्यंत ७२० कुटुंबांमध्ये पोषण परसबागा तयार करण्यात आल्या आहेत. सदर मोहीम राबवण्यामध्ये परंडा तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती तालुका व्यवस्थापक मुकेश लक्षे यांनी दिली.

पोषण परसबागेच्या माध्यमातून घरातील गर्भवती, स्तनदा, किशोरी, लहान मुले यांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगली मदत होणार आहे. तसेच रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने घरच्याघरी पिकवलेला भाजीपाला उपयोगी पडू शकतो. या माध्यमातून कुटुंबाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानामार्फत १५ जून ते १५ जुलै या कालावधीमध्ये ‘माझी पोषण परसबाग मोहीम’ महाराष्ट्रभरात सुरू करण्यात आली आहे.

परंडा तालुक्यातील सीटीसी, कृषी सखी व समुदाय संसाधन व्यक्ती यांच्या माध्यमातून गावपातळीवर पोषण परसबागनिर्मिती मोहीम जोरात सुरू आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी डोंजाचे प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे, अर्नाळाच्या प्रभाग समन्वयिका प्रिया पाटील, लोणीचे समाधान माळी, जवळा समन्वयक गवळी तसेच आरोग्य सखी विद्या अवताडे, प्रिया हजारे, आशा जगताप, नंदा जगताप, इंताज शेख व सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, कृषी सखी, बँक सखी, उपजीविका सखी प्रयत्न करत आहेत. पोषण परसबाग निर्मितीसाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. बलवीर मुंढे, गोरक्षनाथ भांगे, समाधान जोगदंड, अल्ताफ जिकरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Creation of 720 kitchen gardens in fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.