राजस्थानी मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 08:20 PM2024-08-21T20:20:15+5:302024-08-21T20:21:08+5:30

२५ लाख ८६ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप

Crime against 12 persons including Chairman of Rajasthani Multistate Bank | राजस्थानी मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हा

राजस्थानी मल्टिस्टेट बँकेच्या चेअरमनसह १२ जणांवर गुन्हा

उमरगा (जि. धाराशिव) : संपूर्ण महाराष्ट्रात राजस्थानी मल्टिस्टेट बॅंकेचा आर्थिक घोटाळा गाजत असतानाच उमरगा तालुक्यातील आठ जणांची २५ लाख ८६ हजार २६८ रुपयांचा अपहार करून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बँकेच्या चेअरमनसह १२ जणांच्या संचालक मंडळाविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

उमरगा येथील ॲड. दिलीप शंकरराव सगर यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये उमरगा येथे नव्याने सुरू झालेली राजस्थानी मल्टिस्टेट को. ऑफ. क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ यांच्या शाखेची टीव्हीवरील जाहीरात व लोकल जाहिरातींमध्ये आकर्षक व्याजाची जाहिरात पाहून आपण १३ आक्टोबर २०२२ रोजी ३७ महिन्यांसाठी १ लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली. या ठेवीची मुदत १३ ऑक्टोबर २०२५ आहे. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी उमरगा शाखेतील मुदत ठेव मोडून व्याजासह रकमेची मागणी आपण केली होती. त्यावेळी शाखा व्यवस्थापकांनी सध्या फंड उपलब्ध नाहीत. महिन्याभरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. नंतरच्या काळातही हेच कारण सांगण्यात आले. यानंतर संचालक मंडळातील कोणाचाही संपर्क झाला नाही. या बँक शाखेत आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे २५ लाख ८६ हजार २६८ रुपये रक्कम व त्यावरील व्याज संबंधितांना मुदतीत परत न करता या रकमेचा अपहार झाल्याचे स्पष्ट होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून संचालक मंडळातील चंदुलाल बियाणी, बालचंद्र लोढा, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लोढा, अशोक जाजू, सतीश सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, जगदीश बियाणी, व्यंकटेश कुलकर्णी (सर्व रा. परळी, जि. बीड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

 

Web Title: Crime against 12 persons including Chairman of Rajasthani Multistate Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.