तेलही गेले अन् तूपही गेले; वाटणीपूर्वीच गुन्हे शाखेने रेड टाकत चोरीचा मुद्देमाल केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 06:59 PM2021-04-27T18:59:34+5:302021-04-27T19:10:00+5:30
crime news in Usamanabad मोठी कामगिरी फत्ते करुन चैनीची झोप घेणारा मोहन आता जेलची हवा खात आहे.
उस्मानाबाद : अख्खं उन्हं अंगावर घेत दिवसभर टेहाळणी केली... एका सराफाचे दुकान हेरले... रात्र जागून तिघांनी सोमवारी पहाटे धाडसाने हे दुकान फोडले... लाखो रुपयांची सोने-चांदी पळविली... दोन दिवसांनी वाटणी करण्याचे निश्चित करुन तो सुखाची झोप घेत होता. पण, हाय रे दुर्दैव. वाटणीपूर्वीच पोलीस पोहोचले अन् तेलही गेले व तूपही. हा प्रकार जळकोट येथील चोरी प्रकरणातून समोर आला आहे.
मूळचा यमगरवाडी येथील मोहन नागनाथ शिंदे व त्याचे बार्शी तालुक्यातील साथीदार सूरज्या शिंदे व बापू काळे हे तिघेही सध्या हंगरगा पाटी येथील पारधी पेढीवर वास्तव्यास होते. चोऱ्यांचा उद्योग त्यांनी सुरु केलेला. रविवारी दिवसभर या तिघांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील बाजारपेठेत एकाच दुचाकीवरुन फेरफटका मारला. तेव्हा त्यांच्या नजरेत श्रीपाद ज्वेलर्स हे दुकान भरले. सायंकाळी एका शेतात मुक्काम ठोकून पहाटे जळकोटला रवाना व्हायचे व दुकान फोडायचे त्यांनी निश्चित केले. ठरल्याप्रमाणे सोमवारी पहाटे ते जळकोटात गेले. हेरलेले दुकान गाठून त्याचे कुलूप तोडले. मोहन हा बाहेर रखवालीसाठी थांबला. तर सूरज्या व बापू आत शिरले. त्यांनी दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड काही मिनिटातच साफ केली.
यानंतर तेथून पळ काढत पहाटे ५ वाजता हंगरगा पाटी गाठली. येथे सूरज्या व बापू यांनी काही रक्कम व सोने घेऊन नंतर वाटणी करु, असे सांगत काढता पाय घेतला. मोहनने मग ६ किलो ८०० ग्रॅम चांदी, ४० ग्रॅम सोन्याचे दागिने व २५ हजार रोख ही घरातील दिवाणाखाली लपवून ठेवली. या घटनेनंतर गुन्हे शाखा चोरट्यांच्या मागावर होतीच. त्यांना खबरही लागली. ही चोरी मोहन व त्याच्या दोन साथीदारांनी केल्याचे कळले. यानंतर पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांच्या पथकाने तातडीने हंगरगा पाटी गाठून मोहनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त केला. आता पोलीस इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मोठी कामगिरी फत्ते करुन चैनीची झोप घेणारा मोहन आता जेलची हवा खात आहे.
धाडस दाखविले अन् चोरटा सापडला...
जळकोट येथील ज्वेलरी फोडल्यानंतर अवघ्या एका दिवसातच गुन्हे शाखेला चोरट्यांची खबर लागली. मात्र, आरोपी पारधी वस्तीवर असल्याने जेमतेम कर्मचार्यांच्या जीवावर त्याला पकडणे जोखमीचे होते. तरीही धाडस करुन निरीक्षक घाडगे, उपनिरीक्षक भुजबळ, कर्मचारी सय्यद, चव्हाण, मरलापल्ले, आरसेवाड, महिला कर्मचारी होळकर यांच्या पथकाने वस्ती गाठली व आरोपी मोहनला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर अधीक्षक संदीप पालवे यांनी गुन्हे शाखेचे कौतुक केले.