कळंब शहर, परिसरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:24 AM2021-06-06T04:24:36+5:302021-06-06T04:24:36+5:30
कळंब : एका समाजातील दोन गटात जोरदार भांडणे होतात व बंदुकीने फायरिंग होते, व्यापाऱ्यावर हल्ला होतो, बनावट नोटा ...
कळंब : एका समाजातील दोन गटात जोरदार भांडणे होतात व बंदुकीने फायरिंग होते, व्यापाऱ्यावर हल्ला होतो, बनावट नोटा सापडतात, तब्बल दीड कोटी रुपयाचा गांजा येतो व तो लपवून ठेवला जातो, मोटारसायकल चोरांना शोधण्यास उशिरा यश येते व आज शहराच्या मध्यवर्ती भागात एकाचा खून होतो... कळंब शहर व परिसरात मागील तीन वर्षांपासून या घटनांनी सर्वसामान्यांची झोप उडविली. या घटना थांबणार आहेत की नाही, असा प्रश्न आता सर्वसामान्यातून विचारला जातो आहे.
कळंब शहर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. सध्या कोरोना संसर्गाने बाजारपेठ कुलूपबंद केली असली तरी सर्वसामान्यपणे येथे खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल होते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती येथेही बोकाळली आहे. यावर अंकुश ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असतानाही मागील ३-४ वर्षात यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
जवळपास तीन वर्षांपूर्वी शहरातील साठे चौक परिसरात एका समाजाच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कळंबमध्ये खळबळ उडाली होती. तेंव्हा पोलिसांनी या पिस्तूल प्रकरणात काय कार्यवाही केली तो तपासाचा भाग होता; मात्र त्यानंतर शहरात गुन्हेगारी वाढण्याचे प्रमाण आजच्या घटनेने कायम असल्याचे पुन्हा समोर आले.
व्यापारी हल्ला प्रकरण, बनावट नोटा, दीड कोटींचा गांजा, मोटारसायकल चोरी रॅकेट, बाजार समिती परिसरातील आजची खुनाची घटना या ठळक घटना आहेत. याव्यतिरिक्त शहर व तालुक्यात वाढलेल्या मटका बुकी, त्याचा उघड होणारा धंदा, गल्लोगल्ली चालू झालेले जुगार क्लब, गावठी दारू अड्डे या अवैध धंद्यांनी सध्या लॉकडाऊनमध्येही चांगलेच प्रस्थ वाढवले आहे.
या वाढत्या अवैध धंद्यांनी नवीन गुंडाच्या टोळ्याही शहरात जन्माला घातल्या आहेत. त्या टोळ्या या अवैध धंद्याबरोबर बाकी गुन्हेगारी कृत्यात कार्यरत झाल्याची शंकाही काही मंडळीकडून व्यक्त केली जात आहे. या नवीन टोळ्यांना वेसण घातली नाही तर शहरात गुन्हेगारी आटोक्यात आणणे आगामी काळात अवघड होईल, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
चौकट -
आता गृहमंत्र्यांनाच घालणार साकडे
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. याबाबत आम्ही मागील तीन वर्षांपासून सातत्याने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन सक्षम अधिकारी नेमावा व शहर तसेच तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा घालावा, गुन्हेगारी घटनाना पायबंद घालावा, अशी मागणी करीत आहोत. आजच्या घटनेने नागरिकांत, व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण आहे. कळंब येथील विविध घटनाचा तातडीने तपास करावा, अवैध धंदे कायम बंद करावेत या मागणीसाठी आम्ही थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी सांगितले.