लसीकरणासाठी सावरगावात ग्रामस्थांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:46+5:302021-05-13T04:32:46+5:30
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी २०० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले होते. दुसरा डोस मिळविण्यासाठी दवाखान्याबाहेर ...
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी २०० कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस प्राप्त झाले होते. दुसरा डोस मिळविण्यासाठी दवाखान्याबाहेर ज्येष्ठ नागरिकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ४५ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे जवळपास ५०० ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच आपल्या घरी परतावे लागले.
मार्च महिन्यापासून सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. एप्रिल महिन्यात लसीकरणाला गती मिळाली. लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लस टोचून घेण्यासाठी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी करीत आहेत.
बुधवारी सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात २०० कोरोनाचे डोस प्राप्त झाले. त्यासाठी ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे नियोजनाचा फज्जा उडाला. अचानक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी ४५ दिवस पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतल्याने सहा तास ताटकळत उभारलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस न घेताच परत फिरावे लागले. सकाळी दहा वाजता गर्दी पांगविण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांना पाचारण केले. सपोनि सचिन पंडित, पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले यांनी कर्मचाऱ्यासह दवाखान्यास भेट देऊन गर्दी पांगविली. उपलब्ध लसीचा डोस टोचण्यासाठी डॉ. स्नेहा मोटे, डॉ. स्नेहल क्षीरसागर, डॉ. स्नेहा शिंदे, औषध निर्माता संदीप जगताप, भिंगारे, ठाकर, भालशंकर, आरोग्य पर्यवेक्षिका शोभा आदलिगे, आदी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
(चौकट)
दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संकट काळात रुग्णसेवा बजावून कोरोना लसीकरण करणाऱ्या डॉ. स्नेहा मोटे, डॉ. स्नेहल क्षीरसागर या दोन महिला डॉक्टरांची सेवा समाप्तीचा निर्णय आरोग्य विभागाने घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडले. मंगळवारी डॉ. माशाळकर व डॉ. कराळे यांची नियुक्ती केल्याचा आदेश धडकला आहे. संकट काळात सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरांची सेवाच समाप्त केल्याने सावरगाव भागातील ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.