उस्मानाबादेत वीज जोडणीसाठी ग्राहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 07:03 PM2018-07-23T19:03:36+5:302018-07-23T19:05:22+5:30
डिमांड भरूनही घरी वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या एका वीज ग्राहकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़
उस्मानाबाद : डिमांड भरूनही घरी वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या एका वीज ग्राहकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ ही घटना आज सकाळी शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर घडली़
शहरातील तांबरी विभागात राहणारे सचिन चौधरी यांनी घरी वीजजोडणी मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या शहर कार्यालयात डिमांड भरले आहे़ डिमांड भरल्यानंतर कंपनीकडून मेसेज आला की २४ तासात वीजजोडणी मिळेल, असे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते़ मात्र, सलग आठ ते दहा दिवस पाठपुरावा करूनही वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या सचिन चौधरी यांनी पेट्रोलची बाटली हातात घेऊन सकाळी महावितरणचे शहर कार्यालय गाठले़.
उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मीटर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा दिला जाईल, असे सांगताच चौधरी यांनी हातातील बाटलीमधील पेट्रोल अंगावर ओतून घेतले़ यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ वीजकनेक्शन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर चौधरी यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.