वादळी पावसाने पेरू, लिंबाच्या बागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:25 AM2021-06-04T04:25:16+5:302021-06-04T04:25:16+5:30
मुरूम : शहर व परिसरात गुरुवारी पहाटे २ ते ३ दरम्यान वादळी वाऱ्यासह तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसात ...
मुरूम : शहर व परिसरात गुरुवारी पहाटे २ ते ३ दरम्यान वादळी वाऱ्यासह तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसात उमरगा, केसरजवळगा येथील श्रीमंत भुरे यांच्या शेतातील पेरू व लिंबूच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच उमरगा येथील १३२ वीज उपकेंद्रांतून वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने मुरुम, आलूर, गुंजोटी या वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या २० गावांत जवळपास दहा तास बत्ती गुल झाली. शहर व परिसरातील केसरजवळगा, आलूर, बेळंब, कोथळी, भुसणी आदी भागांत गुरुवारी पहाटे २ ते ३ या दरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तासभर दमदार पाऊस झाला. वादळी पावसामुळे केसरजवळगा येथील श्रीमंत भुरे यांच्या शेतात लावलेले दीड एकर पेरू आणि दीड एकर लिंबाच्या बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे पेरू आणि लिंबूची अनेक झाडे मुळासकट उन्मळून पडली, तसेच परिसरातील आंब्याच्या झाडांचेही नुकसान झाले. या पावसामुळे उमरगा येथून वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्हीच्या मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने आलूर उपकेंद्राअंतर्गत येणारी केसरजवळगा, अचलेर, आलूर, वरनाळ, बोळेगाव, तर मुरुम उपकेंद्राअंतर्गत येणारी कंटेकूर, कोथळी, बेळंब, नाईकनगर, गणेशनगर, आनंदनगर आणि गुंजोटी उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गुंजोटी, भुसणी, औराद, कदेर, मुरळी, कसगी या गावांतील वीजपुरवठा गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास खंडित झाला. बिघाडाची दुरुस्ती झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास तो पूर्ववत झाला. सलग दहा तास वीज गुल झाल्याने परिसरातील नागरिकांचे उकाड्याने हाल झाले.
कोट.......
वादळी पावसामुळे उमरगा ते गुंजोटी दरम्यान असलेल्या मुख्य वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मुरुम शहराला येणेगूर येथील वीज उपकेंद्रातून पहाटे चार वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ग्रामीण भागात मात्र बिघाडाची दुरुस्ती झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. आलूर ते उमरगा या ३३ वाहिनीचे एकूण अंतर ३० ते ३५ किलोमीटरचे आहे. त्यामुळे बिघाड शोधण्यात अधिक वेळ लागला.
- सागर सायगावकर, कनिष्ठ अभियंता, महावितरण.