डेंग्यूचा धोका, तरीही आरोग्य यंत्रणा सुस्तच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:23+5:302021-07-28T04:34:23+5:30
कळंब : तालूक्यातील विविध गावात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण दिसून येत असले तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठल्याच ...
कळंब : तालूक्यातील विविध गावात डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे रूग्ण दिसून येत असले तरी आरोग्य यंत्रणेकडून मात्र अद्याप कुठल्याच ठोस उपाययोजना आखल्याचे दिसत नाही. ना गृहभेटी ‘प्रॉपर’ होत आहेत, नाश्टकीक सर्वेक्षण. त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात तापांच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसणारे अनेक लहान मुले शहरातील विविध दवाखान्यात उपचार घेत आहेत. याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, पावसाळ्यातील साथरोगांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही विशेष काळजी घेण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कीटक सर्वेक्षण व गृहभेटीचा सोपस्कारही पार पाडल्याचे दिसून येत नाही. गावच्या स्वच्छतेचा जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतींचेही याकडे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे इटकूरसारख्या नाली काढत सांडपाणी प्रवाही केलेल्या काही गावाचा अपवाद वगळला तर नाली काढणे, स्वच्छता राखणे हा आपला ‘जॉबचार्ट’ आहे, याचाच विसर ग्रा.पं. ला पडल्याचे चित्र आहे.
यामुळेच विविध गावात साथीच्या आजाराचा धोका बळावत चालला आहे. तापरोगांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषतः बालकं यामुळे बेजार झाले आहेत. कळंब व लगतच्या शहरातील विविध दवाखान्यात डेंग्यू व डेंग्यू सदृश आजाराचे अनेक रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध गावात डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले असताना उपाययोजनांच्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात तालुका आरोग्य अधिकारी कमी पडत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उपाययोजनांबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका आरोग्याधिकारी प्रदीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. वडगावे यांनी तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना देऊ, असे सांगितले.
चौकट....
आठ दिवस झाले, रिपोर्टचा पत्ता नाही...
तालुक्यातील कोथळा, भाटसांगवी, कन्हेरवाडी, आंदोरा, इटकूर आदी गावात डेंग्यूसदृश रुग्ण दिसून आले आहेत. यापैकी कन्हेरवाडी येथील आठ व आंदोरा येथील पाच रक्ताचे नमुने बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २१ जुलै रोजी पाठविण्यात आले होते. ईटकूर प्राथमिक आरोग्य केंद्राने हे नमुने संकलित केले आहेत. परंतु, आठ दिवस झाले तरी बीड येथील प्रयोगशाळेचे तपासणी अहवाल प्राप्त झाले नव्हते. यामुळे एखाद्या संशयिताच्या जीवाला धोका झाल्यावर त्याच्या आजाराचे निदान करण्याचा आरोग्य विभागाचा कार्यक्रम आहे का असा संतप्त सवाल केला जात आहे.
सर्वेक्षण अन् गृहभेटी केेव्हा?
दरम्यान, साथरोगांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांनी सम, विषम क्रमांक दिलेल्या घरातील पाण्याचे साठे, तेथील कीटकांची स्थिती तपासणे गरजेचे आहे. याशिवाय आरोग्य सेविका यांनी व्यक्तिगत सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. असे असताना गावोगावी यासाठी गृहभेटी होतच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एम क्रमांकानुसार घराला पंधरवड्यातून एकदा भेटी देणं, पाणीसाठे तपासणे या कामाचे आरोग्य कर्मचाऱ्यांना सोयरसुतक राहिले नाही. यामुळे या गृहभेटी, सर्वेक्षण वाढवावे अशी मागणी होत आहे.