कळंब शहरात गंजलेल्या विद्युत पोलचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:10 AM2021-09-02T05:10:10+5:302021-09-02T05:10:10+5:30

कळंब : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतु, कळंब येथील महावितरण कार्यालयाला ही म्हण ...

Danger of rusty electric poles in Kalamb city remains | कळंब शहरात गंजलेल्या विद्युत पोलचा धोका कायम

कळंब शहरात गंजलेल्या विद्युत पोलचा धोका कायम

googlenewsNext

कळंब : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित आहे. परंतु, कळंब येथील महावितरण कार्यालयाला ही म्हण लागू होत नाही. लेटलतीफ कामाचे रेकॉर्ड आता कळंबच्या महावितरणच्या नावे नोंदवावे लागेल का, असा सवाल शहरवासियांतून विचारला जातो आहे. जवळपास चार वर्षांपासून शहरातील गंजलेल्या लोखंडी विद्युत खांबाना हटविण्यासाठी महावितरणला मुहूर्त लागत नसल्याने हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

कळंब शहरातील कल्पना नगर भागात मोठी लोकवस्ती आहे. उदय खंडागळे यांचे घर ते माजी आमदार भोसले यांच्या घरादरम्यान असलेल्या भागात विद्युतवाहक दोन पोल खालच्या बाजूला गंजून त्याला छिद्रे पडली आहेत. त्यापैकी एक पोल नालीमध्ये उभा केला असल्याने त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. हे पोल कधी त्याबाजुने जाणाऱ्या व्यक्तींच्या अंगावर कोसळतील याची शाश्वती नाही. येथील नागरिकांनी याबाबत महावितरण तसेच न. प. प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरीही हे पोल काढण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे या पोलच्या शेजारी नवीन पोल बसविण्यात आले आहेत. त्यालाही आता चार वर्षे उलटून गेली आहेत. महावितरणला एखादा अपघात झाल्यानंतर जाग येणार आहे का? असा प्रश्न आता या भागातील नागरिकांतून व्यक्त केला जातो आहे.

शहरातील कल्पना नगर भागातील ही अवस्था असताना शहरातील इतर भागातही काही ठिकाणी विद्युत पोल धोकादायकरित्या झुकलेल्या अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी तारा सतत ठिणग्यांचा खेळ दाखवितात. अनेक डी. पी. सताड उघड्या ठेवल्या जात असल्याने महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोट.........

पोल बदलण्याचे, तारा ओढण्याची कामे कंत्राटदारांकडे आहेत. कल्पना नगर भागातील तसेच आणखी दोन ठिकाणी पोल बदलण्याची शहरातील कामे करावयाची आहेत. त्यासाठी आम्ही संबंधित कंत्राटदारांना सूचना देणार आहोत. कंत्राटदारानी कामाला सुरुवात केली की प्राधान्यतत्वावर कल्पना नगर भागातील ते दोनीही पोल बदलण्यात येतील.

- वैभव गायकवाड, सहाय्यक अभियंता, कळंब

कल्पना नगर भागातील विद्युत पोल बदलण्यासंदर्भात आम्ही महावितरणला निवेदन दिले आहे. अनेकदा अधिकारी, कर्मचारी यांना तोंडी माहिती दिली परंतू महावितरण हलायला तयार नाही. कार्यालयात अधिकारी हजर नसतात, कर्मचारी इतर कामे करतात. नागरिकांचा सहनशक्तीचा अंत होत असून, महावितरण एखादा बळी गेल्यानंतर कामे करणार आहे का?

सतपाल बनसोडे, पदाधिकारी, भाजपा

चौकट -

हे दोनीही विद्युत पोल धोकादायक आहेत. याबाबत आम्ही मागील चार वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. हे किती धोकादायक आहे, याची साधी पाहणी करायलाही अधिकारी, कर्मचारी येतं नाहीत. कंत्राटदार येईल, काम करेल असे सांगितले जाते. मात्र, एकही कंत्राटदार तिकडे चार वर्षात फिरकला नाही. कधी हा पोल कोसळेल याची खात्री देता येणार नाही.

- अमोल कंगळे, रहिवासी, कल्पना नगर

Web Title: Danger of rusty electric poles in Kalamb city remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.