कोरोनामुळे पतीचा मृत्यू; कुटूंब आले उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:21+5:302021-05-28T04:24:21+5:30
तामलवाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचा मृत्यू झाल्यामुळे सुखी संसाराची स्वप्न अर्ध्यावर मोडली. शिवाय, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने ...
तामलवाडी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पतीचा मृत्यू झाल्यामुळे सुखी संसाराची स्वप्न अर्ध्यावर मोडली. शिवाय, कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंब उघड्यावर आल्याने तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील महिलेचा सध्या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील नागनाथ कोले याची मुलगी सुप्रिया हिचा नऊ वर्षांपूर्वी श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव (खुल) येथील जाधव कुुटुंबातील महेंद्र यांच्याशी विवाह झाला होता. ९ वर्षे सुखी संसार चालला. त्यांना दोन अपत्ये झाली. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सुप्रिया या कृष्णा (वय ७) आणि श्री (वय ३) या दोन्ही मुलांना घेऊन कदमवाडी येथे माहेरी राहायला आल्या. यावेळी निमगाव (खुल) येथे राहणाऱ्या जाधव कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आणि यातच ४ मे रोजी पती महेंद्र जाधव (वय ३३) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामुळे सुप्रिया यांचा सुखी संसार अर्ध्यावर मोडला. पतीच्या मृत्यूची बातमी कदमवाडीत कळताच गावावर शोककळा पसरली. पतीच्या अंत्यविधीलाही सुप्रिया यांना जाता आले नाही.
सुप्रिया यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, दोघा चिमुकल्यांना अद्याप शाळेची ओळखदेखील नाही. निमगावात तीस गुंठे जमीन असली तरी त्यात उदरनिर्वाह भागविणे अशक्य असल्याने सुप्रिया या सध्या दोघा चिमुकल्यांसह कदमवाडी येथेच आई-वडिलाच्या घरी राहून जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. दरम्यान, सुप्रिया यांच्या प्रमाणेच कोरोनामुळे अनेकांचे संसार असे अर्ध्यावर मोडले आहेत. अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी तसेच शासनाने देखील अशा कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे.