आराेग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात चिमुकलीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याचा नातेवाइकांचा आराेप
By बाबुराव चव्हाण | Published: October 4, 2023 04:32 PM2023-10-04T16:32:45+5:302023-10-04T16:35:11+5:30
भूम ग्रामीण रुग्णालयात काही काळ गाेंधळाचे वातावरण
धाराशिव/भूम : राज्याचे आराेग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजीराव सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या भूम येथील ग्रामीण रुग्णालयात एक वर्षीय चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डाॅक्टर उपस्थित नसल्याने चिमुकलीस ऑक्सिजन देता आला नाही, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. संबंधित डाॅक्टरविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी करीत नातेवाईक तसेच नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. त्यामुळे काही काळ गाेंधळाचे वातावरण हाेते. चाैकशीअंती दाेषींवर कारवाई करू, अशी ग्वाही वरिष्ठांनी दिली.
भूम येथील सद्दाम पठाण यांची सादिया सद्दाम पठाण (रा. शेकापूर, ह.मु. भूम) एक वर्षीय चिमुकली दाेन दिवसांपासून आजारी हाेती. तिला खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले हाेते. परंतु, तिथे ऑक्सिजनची सुविधा नसल्याने संंबंधित डाॅक्टरांनी भूम ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यानुसार बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पठाण यांनी सादियाला रुग्णालयात आणले. मात्र, पावणेनऊ वाजेपर्यंतही ऑक्सिजन न लावल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाइकांनी आक्राेश करीत जबाबदार डाॅक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी केली. ताेवर शहरातील नागरिकांनीही रुग्णालय परिसरात माेठी गर्दी केली. जाेवर डाॅक्टरांवर कारवाई हाेत नाही ताेवर माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे जवळपास दाेन तास रुग्णालयाच्या आवारात गाेंधळाचे वातावरण हाेते.
माहिती मिळताच भूमचे तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार संजय स्वामी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रकरणाची चाैकशी करून दाेषींविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना दिला जाईल, अशी ग्वाही दिली. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. इस्माईल मुल्ला यांनीही भेट दिली. दैनंदिन हजेरीपत्रक तपासले असता, अनेक दिवसांच्या उपस्थितीबाबत नाेंदी दिसल्या नाहीत. काेण किती वाजता दवाखान्यात आले, हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही तपासले असता, तेही बंद निघाले, हे विशेष. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार कारवाईचा प्रस्ताव देणार असल्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईक, नागरिकांनी रुग्णालय परिसर साेडला.
कागदपत्रे घेतली ताब्यात...
मयत सादिया हिच्यावर करण्यात आलेल्या उपचाराची सर्व कागदपत्रे, हजेरी मस्टरही डाॅ. मुल्ला यांनी ताब्यात ताब्यात घेतले आहे. चाैकशीअंती जे काेणी दाेषी आढळून येतील त्यांच्याविरुद्ध कठाेर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे त्यांनी म्हटले.